DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- दत्तात्रय माने
पुणे – हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी म्हणून अवघे पंचवीस वर्षे वय असलेले तरुण प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अनमोल मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हवेली पोलीस ठाण्याचे तात्पुरते प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्याकडून अनमोल मित्तल यांनी पदभार स्वीकारला. सचिन वांगडे यांची पुन्हा पुणे ग्रामीण मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी हे आदेश जारी केले आहेत. हवेली पोलीस ठाण्याचा पदभार स्विकारताच अनमोल मित्तल हे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी हद्दीतील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची कुंडली पडताळण्यास सुरुवात केली आहे.
गुन्हेगारी टोळ्यांतील सदस्यांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाईला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल अशाप्रकारे पोलीस ठाण्याचा कारभार चालविण्यावर भर देण्यात येणार असून पुढील काळात पर्यटन स्थळी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठीही आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मित्तल यांनी सांगितले.
हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही काळात वाढलेली अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या, समाजकंटकांकडून होणारी महिलांची छेडछाड, गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्ववादामुळे घडणारे गंभीर गुन्हे हे रोखण्यासाठी अत्यंत तरुण असलेले आयपीएस अनमोल मित्तल किती प्रभावी उपाययोजना करतात या प्रश्नाचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल. सद्यस्थिती मात्र आयपीएस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्याने अवैध व्यावसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.



