DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय गुरव
शहादा – नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे एक लाख वृक्षलागवड करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पाच हजार वृक्ष लागवड शहादा तालुक्यातील दुधखेडा धरण परिसरात केल्या नंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण होणार आहे. यापूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत शाळा, महाविद्यालय, पडीक जमिनी, माळरान इत्यादी ठिकाणी लोक-सहभागातून ९५ हजार वृक्षलागवड करण्यात आलेली आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील १८ ऑगस्टला जिल्हा भेटीसाठी येत आहेत. तसेच ते शहादा येथे पोलिस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे उद्घाटन करणार आहेत. जिल्हा पोलीस दलातर्फे त्या दिवशी सकाळी आठला डॉ. शेखर पाटील यांच्या हस्ते दुधखेडा (ता. शहादा) येथे धरण परिसरात वृक्षलागवड करून एक लाख वृक्षारोपणाचा संकल्पपूर्ती कार्यक्रम होणार आहे.९५ हजार वृक्षलागवड करण्यासाठी जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालय, सामाजिक संघटना व स्थानिक नागरिकांनी स्वयंस्फूर्तने सहभाग नोंदविला होता.
त्यानंतर संभाव्य गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व घडलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींना शोधण्यासाठी डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात येणारा एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमाचे उद्घाटन शहादा येथील जुन्या पोलीस ठाण्याजवळ व्यापारी तसेच नागरिकांच्या उपस्थितीत होईल.
शहादा तालुका व शहरातील सर्व शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना व नागरिकांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की दुधखेडा येथील धरण परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शुक्रवारी (ता. १८) सकाळी आठ वाजता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे.



