DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – सुनिल मैदिले
पवनी :- महसूल विभागाच्या आशीर्वादाने पवनी (जी. भंडारा) तालुक्यात सुरु असलेले अवैध वाळूघाट तात्काळ बंद करण्याची मागणी आज भोजापूरकरानी पवनीचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांच्याकडे केली.
भाजप नेते मोहन सुरकर यांच्या नेतृत्वात भोजापूर (जी. भंडारा) येथील महिला व पुरुषांनी आज दुपारी पवनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांना घेराव घातला. भोजापूर येथे दोन अवैध वाळू घाट सुरु आहेत. या घाटांमधून जेसीबी, पोकलंड आदींच्या सहाय्याने रात्रंदिवस वाळूचा उपसा केला जातो. ही वाळू ट्रॅक्टरद्वारे ठिकठिकाणी गोळा करून नंतर ती टिप्पर, ट्रक मध्ये भरून विकली जाते. दररोज येथून शंभर ते दीडशे ट्रक वाळू भरून जातात. दिवसरात्र भरधाव वाहनांची रस्त्याने वर्दळ असते. सर्वाधिक त्रास ट्रॅक्टरचा असतो. ट्रॅक्टरद्वारे घाटातून आणलेली वाळू रस्त्यावरच खाली करण्यात येत असल्याने ठिकठिकाणी वाळूचे थर साचलेले बघायला मिळतात. अनेकदा त्यावरून दुचाकी घसरून अपघाताच्या घटना घडतात. या सर्व प्रकाराची महसूल प्रशासनाला कल्पना आहे. मात्र थातूरमातुर कारवाई पलीकडे त्यांच्याकडून वाळू तस्करी थांबविण्यासाठी कसलीही ठोस पाऊले उचलण्यात येत नही. महिनाभरापूर्वी वाळू भरलेला भरधाव ट्रॅक्टर उलटून त्यात 18 वर्ष वयाच्या युवकाचा जीव गेला होता. या घटनेनंतर गावात तणावाची स्थिती निर्माण होऊन अवैध वाळू घाटांविरुद्ध कारवाईची मागणी केली गेली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी घाट बंद करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र घाट पूर्ववत सुरु आहेत.
घाट बंद नाही झाल्यास रस्ता रोको करू असा निर्वानीचा इशारा आज भोजापूरवासियांनी प्रशासनाला दिला. निवेदनाच्या प्रती पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा देण्यात आल्यात. यावेळी सरपंच सीमा राजेश पडोळे, उपसरपंच श्रीधर रंगारी, तंटा मुक्त समिती अध्यक्ष देविदास लकडस्वर, संदीप नंदरधने, किशोर फुलबांधे, दादा खोब्रागडे, विजय नारदेलवार, विशाल रामटेके, सुजाता खोब्रागडे, पल्लवी खोब्रागडे, केशिनी अडीकणे, रुपाली खोब्रागडे आदींसह मोठ्या संख्येनी महिला व पुरुष उपस्थित होते.
—-> तहसीलदार सोनोने याच्या संपत्तीची चौकशी करा – नागरिकांची मागणी
मागील कही महिन्यांपासून पवनी तालुक्यात वाळू तस्करी प्रचंड वाढली आहे. यासाठी तहसीलदार महेंद्र सोनोने हेच जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली. महसूल विभागाचे अभय असल्यानेच तालुक्यात वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.
—-> भोजापूर येथे दोन वाळू घाट असून ते खोब्रागडे आणी धोनी चालवीतात. भोजापूर मार्गावर असलेल्या धानोरी येथील घाट बोदिले व मंडपे, तर खातखेडा येथे दोन घाट असून ते सावरबांधे, मेश्राम, हटवार, सुरकर ही मंडळी चालवीतात.



