- घरघुती भांडणातून घेतले होते विष
- हेड कॉन्स्टेबल धात्रक यांचे सर्वत्र अभिनंदन
- DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदिळे
भिवापूर :- घरघुती भांडणातून विष प्राशन केलेल्या युवकाचे पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे प्राण वाचले. त्याला जीवदान देणाऱ्या पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
शुभम दामोधर फुलझेले (25) असे युवकाचे नाव असून तो येथील सिद्धार्थ नगर परिसरात राहतो. त्याच्यावर नागपूर येथील मेडिकल कॉलेज मध्ये उपचार सुरु असून सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. शुभमने सोमवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
सोमवारी (दी.5) सकाळी घरघुती कारणावरून शुभमचा पत्नीशी वाद झाला. त्यात शुभमने पत्नीला मारहाण केली. भांडण सोडवायला गेलेले त्याचे वडिल दामोधर फुलझेले यांच्यावरही त्याने हात उगारला. हा प्रकार नेहमीचाच असल्याने कंटाळलेल्या पत्नीने सकाळी पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास शुभम नागतरोली मार्गावर असलेल्या त्याच्या शेतात गेला. या ठिकाणी काम करीत असलेल्या वडिलांना त्याने शिवीगाळ केली. मी माझा जीव संपवतो म्हणत बाजूला पडलेली कोरेजन नामक कीटक नाशकाची बॉटल तोंडाला लावली. दामोधर यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्याने दूर लोटले. विष पोटात जाताच त्याची अवस्था बिघडु लागली. घाबरलेल्या वडिलांनी त्याला रुग्णालयात नेण्याचे प्रयत्न केले. परंतु त्यांना नकार देत तो शेतात दुरवर निघून गेला. घाबरलेल्या अवस्थेत दामोधर यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंद धात्रक यांना मोबाईलवर माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ध्यानात घेत वेळ न घालविता धात्रक वासुदेव समर्थ नामक शिपायासह लागलीच शेतावर पोहचले. तोपर्यंत शुभमची अवस्था चांगलीच बिघडली होती. धात्रक यांनी त्याला कसे तरी दुचाकीवर मांडून येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आकरे यांनी तातडीने उपचार करीत पोटातील विष बाहेर काढले. स्थिती सामान्य झाल्यानंतर सायंकाळी उशीरा पुढील उपचाराकरीता त्याला नागपूरला हलविण्यात आले.
हेड कॉन्स्टेबल आनंद धात्रक यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे शुभमला वेळीच उपचार मिळाले व त्याचे प्राण वाचले. याकरिता येथे धात्रक, त्यांचा सहकारी शिपाई वासुदेव समर्थ व उपचार करणाऱ्या डॉक्टरचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. शुभमचा चार महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झाला असल्याचे समजते.
—-> पोलीस शेतात गेले तेव्हा शुभम त्यांना दिसला नाही. त्यांनी शेतात शोधाशोध केली असता एका ठिकाणी झूडपात तो लेटलेल्या अवस्थेत मिळून आला. विषामुळे त्याची अवस्था बिघडू लागली होती. हे. काँ. आनंद धात्रक यांनी त्याला सोबत येण्यास सांगितले असता त्याने नकार दिला. शेवटी त्याला जबरण दुचाकीवर मांडून ते रुग्णालयात घेऊन गेले.



