
उमरेड – भिसी मार्गावर पोलिसांची कारवाई
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी
भंडारा :- चोरीची वाळू भरलेले आणखी 4 टिप्पर भिवापूर (जी. नागपूर )पोलिसांनी शुक्रवारी सकाळी जप्त केले. दोन दिवसांपूर्वीच 4 टिप्परसह 71 लाख 40 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. या कारवाईने वाळू तस्करांत चांगलीच खळबळ माजली होती. त्या धक्क्यातून सावरत नाही तोच शुक्रवारी 4 टिप्पर जप्त करीत पोलिसांनी वाळू तस्करांसह अवैध वाळू घाट चालवीणाऱ्यांना पुन्हा एक दणका दिला.
शुक्रवारी केलेल्या कारवाईत 4 टिप्पर व 32 ब्रास वाळूसह एकूण 81 लाख 60 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. भिवापूर शहर तसेच उमरेड भिसी मार्गावर ही कारवाई करण्यात आली. ठाणेदार जयप्रकाश निर्मल त्यांच्या सहकाऱ्यांसह सकाळी तालुक्यात गस्त घालीत असतांना उमरेड भिसी मार्गाने वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्या आधारे चिचाळा व मालेवाडा शिवारात नाकाबंदी करण्यात आली. दहा वाजताच्या सुमारास टिप्पर क्र. एमएच 36 एए 3750, एमएच 40 सीटी 6505 व एमएच 40 सीटी 5446 हे उमरेडच्या दिशेने जाताना दिसून आले. थांबवून चौकशी केली असता त्यात वाळू भरलेली मिळून आली. रॉयल्टी नसल्याने तीनही टिप्पर ताब्यात घेत पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. एका अन्य कारवाईत हवालदार राकेश त्रिपाठी यांनी भिवापूरवरून उमरेडच्या दिशेने जात असलेल्या टिप्पर क्र. एमएच 40 सीएम 5970 ला थांबवून चौकशी केली. त्यात विना रॉयल्टी वाळू भरलेली मीळून आल्याने टिप्पर ठाण्यात जमा करण्यात आला.
वरील प्रकरणी अतुल तुळशीराम मोहरकर रा. बामणी ता. पवनी जी. भंडारा, अमोल ईशान वाघ रा. भिसी जी. चंद्रपूर, संदीप ज्ञानेश्वर वावरे रा तास ता. भिवापूर, निखिल रंगारी रा. चिमणाझरी ता. उमरेड, आशिष भोयर रा. शिंदपुरी ता. पवनी, आशिष थुटे रा. सालेभट्टी ता. भिवापूर या सहा जणांना अटक करण्यात आली. याशिवाय नंदकिशोर हटवार रा. पाचगाव ता. उमरेड, पलाश राघटाटे रा. कावरापेठ, शुभम गुबरे रा. उमरेड व अवैध घाट चालवीणारे किशोर सावरबांधे रा. पवनी आणी तन्नू धोनी रा. भंडारा यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
वरील कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जयप्रकाश निर्मल, उपनिरीक्षक संदीप सडमेक, परिविक्षाधीन उपनिरीक्षक किरण महागावे, राकेश त्रिपाठी, अशोक ठाकूर, रवी जाधव, मनोज चाचरे, निलेश अहिरवार, दिपक ढोके, प्रीतम खोपे, होमगार्ड अय्युब पठाण यांनी पार पाडली.
जप्त केलेली वाळू ही बुटेबोरी मार्गे वर्धा जिल्ह्यात नेली जात होती. अशी माहिती पोलिसांनी दिली.
—-> महसूल विभाग झोपेत ?
भिवापूर पोलिस लागोपाठ कारवाई करुन वाळू तस्करांच्या मुस्क्या आवळत असतांना येथील महसूल खाते मात्र हातावर हात देऊन बसले असल्याची प्रचिती येत आहे. वाळूची वाहने पकडण्यासाठी तहसील कार्यालयाचे सरकारी वाहन दिवसाच नाही तर रात्री अपरात्री वेगवेगळ्या मार्गांवर फिरतांना दिसून येते. परंतु त्यांच्याकडून कारवाई होतांना दिसत नाही. त्यामुळे महसूल अधिकारी रस्त्यांवर फिरून नेमके करतात काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.



