DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- दोन आठवड्यापूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी युवकावर तलवारीने हल्ला चढवीणाऱ्या कारगाव येथील गुंडाची कुही न्यायालयाने आज तुरुंगात रवानगी केली.
इमरान पठाण असे आरोपीचे नाव असून तो गुंडप्रवृत्तीचा असल्याचे समजते. गत मंगळवारला (दि.21) रात्री अड्याळ येथे ऋषभ प्रल्हाद गुरपुडे (25) नामक युवकावर त्याने तलवारीने हल्ला चढवून त्याला जखमी केले होते. कृषभच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादवीच्या कलम 324, 594, 506, 34 घातक हत्यार जवळ बाळगून हल्ला केल्याबाबत कलम 4,25, व 30, 35 अन्वये गुन्हा नोंदवून बुधवारी रात्री त्याला कारगाव येथून अटक केली होती. गुरुवारी कुही येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
गत 6 मे ला येथील साईधाम लान येथे अड्याळ येथील एका कुटुंबाचा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी नाचतांना धक्का लागल्याने आरोपी इमरान व कृषभ गुरपुडे यांच्यात वाद झाला होता. नंतर हा वाद शांत झाला. या घटनेला दोन आठवडे उलटले असतांना मंगळवारी (दि.21) रात्री अकरा वाजताच्या सुमारास इमरान त्याच्या काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन अड्याळला आला. त्याने अमित नरुले नामक कृषभच्या मित्राला फोन करुन शिवीगाळ केली व कृषभला सोबत घेऊन येण्यास सांगितले. काही वेळाने कृषभ गावातील काही मित्रांना सोबत घेऊन इमरानला भेटायला गेला. त्याला बघताच इमरानने शिवीगाळ करीत तलवारीने त्याच्यावर हल्ला चढवला. सुदैवाने कृषभ हल्ल्यातून बचावला मात्र त्याच्या उजव्या हाताचे बोट तलवारीच्या वाराने कापल्या गेले. दरम्यान गावातील कुणीतरी पोलिसांना फोन करुन घटनेची सूचना दिली. पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना येतांना पाहून इमरान व त्याचे सहकारी पळून गेले होते.
—-> सुरुवातीला पोलिसांनी इमरान विरुद्ध काठीने हल्ला केल्याबाबत गुन्हा नोंदविला होता. मात्र इमरानकडे तलवार होती व त्याने तलवारीने हल्ला केल्याचे नंतर स्पष्ट झाल्याने पोलिसांनी गुन्ह्यात वाढ केली. गुन्ह्यात वापरलेली तलवार पोलिसांनी गुरुवारी कारगाव येथून जप्त केली. पुढील तपास हे. काँ. आनंद धात्रक करीत आहेत.



