गांजा विक्री करण्यास आलेल्या ०२ परप्रांतीय इसमांकडून १४ किलो गांजा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची धडक कारवाई
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर:- कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आगामी गणेशोत्सव सणाच्या अनुषंगाने अवैध धंदे, अंमली पदार्थ साठा असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून प्रभावीपणे कारवाई करण्याबाबत जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना आदेश दिले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची वेगवेगळी पोलीस पथके तयार करून अंमली पदार्थ विषयी माहिती घेण्यास सांगितले. माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार कृष्णात पिंगळे व अशोक पोवार यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत शिवाजीनगर पोलीस ठाणे हददीतील कबनूर ते पंचगंगा फॅक्टरीकडे जाणाऱ्या रोडवर दोन इसम हे गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.
त्या बातमीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पोसई जालिंदर जाधव व इतर स्टाफ यांचेसह जाऊन खात्री करून दि. ०३/०९/२०२४ रोजी सायंकाळी छापा टाकला असता ०२ इसम हे दोन बॅगेसह मिळून आले. त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नांवे १) नाथ पुषा माझी वय ३३ वर्षे रा. तांडरंग पोस्ट अंगुर ता. नुगड जिल्हा गजपती राज्य उडिसा व २) पिन्युएल डॅनियल रैत वय १९ वर्षे रा. सिकाबाडी पोस्ट संबलपूर ता. नुगड जिल्हा गजपती राज्य उडिसा असे सांगितले. त्या दोन इसमांकडे असलेल्या दोन बॅगेची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचेमध्ये किंमत रुपये ३,०५,८००/- रुपये किंमतीचा १४ किलो २४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ व ०२ मोबाईल हॅन्डसेट मिळून आले. त्यांना मिळून आलेल्या मुद्देमालासह रितसर कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खोटमोडे-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस पथक मधील पोलीस अंमलदार नामे १) कृष्णात पिंगळे, संजय हुंबे, अशोक पवार, प्रकाश पाटील, सागर चौगले, आमित सर्जे, राजेश राठोड, महेश पाटील, राजू येडगे, शिवाजी मठपती व हंबीर अतिग्रे, महादेव कुराडे यांनी केली आहे.



