
“त्या” वादग्रस्त अधिकाऱ्याच्या नेमणूकीसाठी आग्रह
DPT NEWS NETWORK 🗞️📹✍️🚨 दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी:- अमर मोकाशी –
भिवापूर :- वाळूच्या अवैध वाहतुकीमधून मिळणाऱ्या मलाई वर ठाणेदार निर्मल यांच्या मुळे गडांतर आल्याने मागील वर्षभरापासून येथील बहुचार्चित “आर” गँग च्या हालचाली मंदावल्या होत्या. तीच “आर” गँग आता पुन्हा एकदा सक्रिय झाली असून त्यांच्या कमाईत अडचण ठरलेल्या निर्मल यांची बदली करुन त्यांच्या जागेवर मार्जितील अधिकाऱ्याची नेमणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या लढवीत असल्याच्या चर्चा जोरात सुरु आहेत.
याकरिता त्यांनी सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असलेल्या उमरेड येथील एका नेत्याला सोबत घेतले आहे. “आर” गँग मध्ये पूर्वी दोनच सदस्य होते. उमरेडचा नेता या गँग मध्ये सहभागी झाल्याने आता या गँगची सदस्य संख्या तीन झाली असून उमरेडकर नेता या गँगचा सध्या म्होरक्या असल्याचे बोलले जाते. राजकीय नेत्यांशी जवळीक साधायची, त्यांच्यासोबत फोटो काढायचे. ते अधिकारी कर्मचाऱ्यांना दाखवून त्यांच्यावर छाप पाडायची. नंतर इच्छित ठिकाणी बदली करुन देण्याच्या नावावर त्यांच्याकडून पैसे उकळायचे. हा या ” आर ” गँग चा मुख्य धंदा असल्याचे बोलले जाते. वाळूच्या अवैध वाहतुकीत रग्गड कमाई होत असल्याने ही गँग मागील काही वर्षांपासून वाळूच्या धंद्यात सक्रिय झाली. अधिकाऱ्यांवर नेतेगिरीचे इंप्रेशन झाडून त्यांच्या माध्यमातून अवैध वाळू वाहतुकीतून लाखोची हप्ता वसुली करायची. हा या गँगचा नवीन धंदा झालेला आहे. वर्षभरापूर्वी पर्यंत गँगचे सर्व सुरळीत चालले होते. मात्र निर्मल भिवापूरच्या ठाणेदार पदी रुजू होताच “आर” गँगच्या कमाईला ब्रेक लागला. निर्मल यांनी आल्या आल्याच वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरु केला. लागोपाठ कारवाया करुन त्यांनी वाळू तस्करांना सळो कि पळो करुन सोडले. त्यामुळे वाळूची चोरटी वाहतुक मंदावली. सोबतच “आर” गँगची वसुली बंद होऊन त्यांच्यात अस्वस्थता वाढली. दरम्यान ज्या पक्षाच्या नावावर त्यांची दुकानदारी सुरु होती, त्या पक्षातील नेत्यांनी “आर” गँगला दुधात पडलेल्या माशिप्रमाणे पक्षातील महत्वाच्या पदावरून बाजूला सारले. त्यामुळे आर गँगची अवस्था आणखीच बिकट झाली. दुसऱ्या एखाद्या पक्षात आसरा मिळावा यासाठी ही गँग प्रयत्नशील होती. मात्र त्यांचे कारनामे माहित असल्याने कुणीही मोठा नेता त्यांना जवळ भटकू देत नव्हता. अशात सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असलेल्या उमरेड येथील एका नेत्याने (नावात साधर्म असलेल्या) या गँगला जवळ घेतले. हा नेताही वसुलीत तरबेज असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी उमरेड येथे एका वरिष्ठ नेत्याच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमाच्या नावावर या नेत्याने अनेक अधिकाऱ्यांचे खिसे खाली केल्याच्या चर्चा आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे उपरोक्त सत्कार सोहळ्याच्या आयोजनाचा संपूर्ण खर्च नव्याने पक्षात प्रवेश घेतलेल्या नेत्याने स्वतः केला होता. मग त्या वसुलीबाज नेत्याने अधिकाऱ्यांकडून वसुली नेमकी कशासाठी केली व जमा केलेल्या पैशाचे काय झाले ? या प्रश्नाचे उत्तर त्याच्याच पक्षातील काही मंडळी शोधत आहेत. मात्र अद्याप त्यांना उत्तर सापडलेले नाही.
—–> आधी तक्रार, मग बदलीची मागणी !
असा आहे प्लॅन
वाळूच्या अवैध वाहतुकीमधून पूर्वी सारखीच मलाई खायला मिळावी यासाठी वाळूची चोरटी वाहतूक उघडपणे सुरु होणे “आर” गँगसाठी गरजेचे आहे. मात्र त्यात ठाणेदार निर्मल मुख्य अडसर ठरले आहेत. विना रॉयल्टी वाळू वाहतुकीला त्यांच्याकडून हिरवी झंडी मिळणे शक्य नाही. त्यासाठी निर्मल यांच्या जागी सोयीचे ठरतील अशा अधिकाऱ्याची नेमणूक करने महत्वाचे आहे. त्यादृष्टीने “आर” गँग ने उमरेडकर नेत्याच्या मदतीने हालचाली सुरु केल्या आहेत. निर्मल यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत जाणीवपूर्वक डॉमिनेट करायचे व नंतर त्यांच्या बदलीसाठी फिल्डिंग लावायची असा “आर” गँगचा प्लॅन आहे. काही दिवसांपूर्वी निर्मल यांची एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करण्यात आल्याच्या तसेच सदर तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्याने निर्मल यांची कानउघाडणी केल्याच्या चर्चा पोलीस वर्तुळात रंगल्या होत्या. सदर तक्रार करण्यामागे “आर” गँग असल्याचे सांगण्यात येते.
—-> वाळूच्या धंद्याचा “अभ्यास” असलेल्या अधिकाऱ्याच्या नेमणूकिसाठी आर गँग अग्रही
उमरेड तालुक्यातील एका गावात एका कार्यक्रमादरम्यान बाहेरून नृत्यांगना आणून अश्लील व बिभस्त नृत्य सादर करण्यात आले होते. त्याचे आडिओ व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यावरून सर्वत्र मोठा हो-हल्ला माजला होता. वर्तमानपत्रानमधूनही हे प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणात उमरेड येथील तत्कालीन ठाणेदार यशवंत सोलसे यांना दोषी ठरवून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्याच सोलसे यांची भिवापूर येथे नेमणूक करण्यासाठी “आर” गँग प्रयत्नशील असल्याच्या चर्चा आहेत. उमरेडला रुजू होण्यापूर्वी सोलसे हे पवनी (जी. भंडारा) पोलीस स्टेशनला होते. त्यामुळे त्यांना वाळूचा धंदा व त्यातून होणाऱ्या उत्पन्नाचा चांगला अभ्यास आहे. विशेष म्हणजे त्यांची “आर” गँगशी जुनी ओळख असल्याचे बोलले जाते.



