{DPT news network}पेण : हाफ मर्डरच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने पेण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वडखळ पोलीस ठाण्यात हाफ मर्डरचा गुन्हा दाखल असलेला आरोपी पेण पोलीस ठाण्यात अटकेत होता. टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात तो यशस्वी ठरला आहे. बिरू गणेश महतो (19) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा बोकारो झारखंड येथील रहिवासी आहे. तो पाबल कार्ली येथे एका पोकलन मशिनवर मदतनीस म्हणून कामाला होता.
पोकलन मशिन ऑपरेटर राजेंद्र चोलो यादव हा आरोपी बिरू महतो याला पोकलन मशिन ऑपरेट करताना तसेच जेवण बनविण्यावरुन काही ना काही कारण काढून त्रास देत होता. या गोष्टीचा राग मनात धरुन आरोपी बिरू गणेश महतो याने राजेंद्र यादव याच्या दोन्ही हाताच्या पंजांवर, डोक्यावर, कपाळावर व चेहऱ्यावर लोखंडी कोयत्याने वार करून त्यास गंभीर दुखापत करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.null
या प्रकरणी पोकलन मालकाने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला होता. वडखळ पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. सदर आरोपीला पेण पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र तो टॉयलेटला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडला आणि पोलिसांचे लक्ष नसल्याचा फायदा घेवून त्याने पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. या प्रकारामुळे पेण पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला आहे. आरोपीला शोधण्यासाठी पेण पोलिसांनी 8 पथके बनवली आहेत.