DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:- अमर मोकाशी
भिवापूर :- टिप्परला लटकून रेती वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नायब तहसीलदार संजय राठोड यांच्या धाडसी कृतीने परिसरात एकच खळबळ उडवली आहे. मात्र त्यांच्या या कृतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही “धाडसाची कामगिरी” खरंच गरजेची होती का, की केवळ आत्मप्रशंसेसाठी त्यांनी ही स्टंटबाजी केली ?
अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी राठोड यांनी सोमवारी रात्री एक रेती भरलेला टिप्पर अडवला. मात्र चालकाने संधी साधत टिप्पर वेगाने पळवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी राठोड स्वतः टिप्परला लटकले. येथील ब्राम्हणकर राईस मिल ते साई मंदिर पर्यंत, जवळपास एक किमी अंतर ते लटकून गेले. पुढे रस्त्यावरील गर्दीमुळे चालकाने वेग कमी केला. ही वेळ साधत राठोड यांनी खाली उडी घेतली व स्वतःचा बचाव केला.
हा प्रकार ऐकायला जरी धाडसी वाटत असला तरी, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांच्या अशा आगाऊ व आत्मघातकी वागणुकीवर अनेकांनी टीका केली आहे. राठोड हे कुठलाही बचावात्मक उपाय किंवा सुरक्षा यंत्रणा न घेता थेट टिप्परला लटकले, ही बाब शासकीय शिस्तीला तडा देणारी मानली जात आहे.
कायद्याची अंमलबजावणी करताना अधिकाऱ्यांनी जाणून बुजून स्वतःचा जीव धोक्यात घालावा काय? त्यांचा उद्देश काय होता – रेती तस्करी थांबवणे की प्रसिद्धी मिळवणे? एकट्याने अशा कारवाया करणं कितपत शहाणपणाचं आहे?
तलाठ्याने पोलिसात तक्रार नोंदवून संबंधित चालक व त्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणात राठोड यांच्या निष्काळजी व अविचारी कृतीकडेही लक्ष दिले पाहिजे.
रेती माफियांविरुद्ध कारवाई करणे गरजेचे असले तरी ती शिस्तबद्ध आणि नियोजित पद्धतीने केली गेली पाहिजे. नायब तहसीलदारांनी दाखवलेले धाडस प्रशासनाच्या जबाबदारीला साजेसे होते का, यावरच आता चर्चा सुरू झाली आहे.
फोटो – टिप्परला लटकतांना ना. तहसीलदार संजय राठोड



