DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी परवेज शेख
धाराशिव : जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत गावठी कट्ट्यासह एका आरोपीस ताब्यात घेतले असून चोरीची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई दि. १८ मे २०२६ रोजी कन्हेरवाडी पाटी परिसरात करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी सपोनि अमोल मोरे, पोह राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, मपोह शोभा बांगर व चालक पोकॉ दहीहांडे यांचे पथक कन्हेरवाडी गावाजवळ आले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रशांत उर्फ भमड्या बालाजी काळे, रा. कन्हेरवाडी ता. कळंब व अशोक नाना पवार, रा. बावी ता. वाशी हे दोघे मोटरसायकलवरून कन्हेरवाडी पाटी येथे येणार असून त्यांच्याकडे अग्नीशस्त्र आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास कन्हेरवाडी पाटी येथे संशयितांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर आलेल्या दोघांपैकी एक इसम गावठी कट्टा टाकून पसार झाला, तर दुसऱ्या इसमास पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीने आपले नाव अशोक नाना पवार, रा. बावी शिवार, काटशिवरी पारधी पिढी, ता. वाशी, सध्या रा. कन्हेरवाडी ता. कळंब असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा मिळून आला. चौकशीत पसार झालेल्या आरोपीचे नाव विशाल उर्फ प्रकाश उर्फ भामड्या बालाजी काळे असल्याचे समोर आले.
दरम्यान, आरोपीकडील मोटरसायकलबाबत चौकशी केली असता सदर वाहन मुरुड, जि. लातूर येथून चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात चौकशी केली असता संबंधित मोटरसायकल चोरीप्रकरणी गुन्हा क्रमांक ०४/२०२५, कलम ३०३ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोन गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सपोनि अमोल मोरे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, शोभा बांगर व चालक दहीहांडे यांच्या पथकाने पार पाडली.



