३० वर्षीय सुनील खांडेकर यांचा मृत्यू; अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल, मिरज ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी राजेंद्र पवार
मिरज :- मिरज तालुक्यातील गुंडेवाडी येथे शेतात गेलेल्या एका ३० वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. १९ ऑक्टोबर) सायंकाळी घडली. सुनील तानाजी खांडेकर (वय ३०, रा. गुंडेवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गुंडेवाडीसह परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हत्येमागील नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोटात चाकूचा वर्मी घाव; रुग्णालयात मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील खांडेकर हे रविवारी सायंकाळी शेतात गेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटात चाकूचा वर्मी घाव बसल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
हल्लेखोर कोण? हत्येमागील कारण गुलदस्त्यात!
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील खांडेकर यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, हल्लेखोरांची ओळख काय आणि या हत्येमागे पूर्ववैमनस्य आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासह हत्येचा उलगडा करण्यासाठी मिरज ग्रामीण पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे गुंडेवाडी परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



