🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी साईनाथ खंडेराय
नांदेड: नांदेड जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेत देगलूर पोलिसांना मोठे यश आले आहे. देगलूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून तब्बल १४ लाख १५ हजार रुपये किमतीच्या एकूण २७ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
देगलूर पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी सुरुवातीला शिवकुमार हनुमान कुन्हाडे (वय २८, रा. नायगाव, जि. नांदेड) यास अटक करून त्याच्याकडून १० मोटारसायकली जप्त केल्या होत्या. मात्र, त्याचा साथीदार तुकाराम उर्फ बाळू गंगाधर गिरी (वय २५, रा. टाकळगाव, ता. नायगाव, जि. नांदेड) हा खानापूर फाटा (देगलूर) येथे गाडी विक्रीसाठी आला असता अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता.
पुण्यापर्यंत शोध आणि थरारक कारवाई:
पसार झालेला आरोपी बाळू गिरी सतत ठिकाणे बदलत होता. उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट आणि प्रभारी अधिकारी वैभव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पुणे व इतर संभाव्य ठिकाणी जाऊन त्याचा पाठलाग केला आणि त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीकडे चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेल्या व विक्री केलेल्या आणखी १७ मोटारसायकली (किंमत १०,०५,०००/- रुपये) नव्याने हस्तगत करण्यात आल्या आहेत. आरोपी या गाड्या स्वतःच्या व नातेवाईकांच्या असल्याचे भासवून कमी किमतीत विकून लोकांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
जप्त मालमत्ता:
पहिला टप्पा: १० मोटारसायकली (किंमत रु. ४,१०,०००/-)
दुसरा टप्पा: १७ मोटारसायकली (किंमत रु. १०,०५,०००/-)
एकूण जप्ती: २७ मोटारसायकली (एकूण किंमत रु. १४,१५,०००/-)
सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट, परि. पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी वैभव पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि हणमंत शिंदे, पोलीस अंमलदार अशोक घुमे, नामदेव शिरोळे, ओमप्रकाश डिडेवार, मुजीद पठाण तसेच होमगार्ड आणि सायबर सेलच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सुरू आहे.



