🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी आनंद कांबळे
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील राहत्या घरातून सुमारे १८ लाख ९७ हजार ३५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. करवीर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत जलद व कौशल्याने तपास करत अवघ्या ४८ तासांच्या आत या चोरीचा छडा लावला आहे. पोलिसांनी आरोपीकडून १३.८ तोळे वजनाचे सर्व सोन्याचे दागिने जप्त केले असून एका संशयिताला अटक केली आहे.
गोव्यात कसिनो जुगारात उधळले पैसे!
शिंगणापूर (सूर्यनगरी, हनमंतवाडी रोड) येथील रहिवासी व व्यावसायिक आतिश संजय चौगुले (वय २६) यांच्या घरातून ऑक्टोबर २०२५ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून करवीर पोलीस ठाण्यात ३० ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार गुन्हे शोध पथकाने वेगाने तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित आरोपी आदित्य संजय चौगुले (वय २१, रा. सूर्यनगरी, शिंगणापूर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली.
चोरी केलेले सोन्याचे दागिने विकून आलेली रक्कम त्याने गोव्यातील कसिनोमध्ये जुगार खेळून उधळल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
हस्तगत करण्यात आलेला मुद्देमाल (किंमत ₹ १८,९७,३५०/-)
पोलिसांनी पंचनाम्याद्वारे आरोपीकडून खालील सर्व १३.८ तोळे (१३८ ग्रॅम) सोन्याचे दागिने जप्त केले आहेत:
मंगळसूत्र: १
लक्ष्मीहार: १
सोन्याच्या अंगठ्या: ६
सोन्याच्या चेन: ४
कर्णफुले: १ जोड
कानातील रिंगा (साखळीसह): १ जोड
नागरिकांमधून कौतुक
करवीर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत संपूर्ण मुद्देमालासह चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे शिंगणापूर परिसर व नागरिकांमधून पोलिसांच्या या धडक कारवाईचे मोठे कौतुक व समाधान व्यक्त होत आहे.
तपास पथक:
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार, पोलीस अंमलदार विजय तळसकर, महेश बांबळे, रणजित पाटील, प्रकाश कांबळे, प्रविण बोरचाटे, श्रीधर जाधव, सोमराज पाटील, अमोल चव्हाण व आत्माराम शिंदे यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास पोवार करत आहेत.


