🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवणाऱ्या करवीर पोलिसांनी वाशी गाव हदितील सनराईज लॉजींग येथे हायप्रोफाईल देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी दोन दलालांना अटक केली असून देहव्यापारासाठी आणलेल्या एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात बेकायदेशीर देहव्यापार चालविणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल, यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही व्यक्ती व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकांशी संपर्क साधून हायप्रोफाईल देहव्यापार चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून सापळा रचला.
कारवाईदरम्यान कृष्णा पाटील (वय ३५, रा. शेळेवाडी, ता. करवीर) व विक्रम कांबळे (रा. कासारवाडी, ता. राधानगरी) यांना ताब्यात घेण्यात आले. दोघेही महिलांना पैशांचे आमिष दाखवून ग्राहक उपलब्ध करून देत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन, इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. या रॅकेटचे शहरासह परिसरात विस्तृत जाळे असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने पुढील तपास सुरू आहे.
याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम, १९५६ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रॅकेटशी संबंधित इतर आरोपी, महिला पुरवठादार आणि ग्राहकांचा शोध पोलीस घेत असून आणखी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे शोध पथकाने संयुक्तरीत्या पार पाडली. अवैध धंद्यांविरोधातील पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून अशा बेकायदेशीर रॅकेटविरुद्ध पुढेही कठोर मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



