🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
⭐प्रतिनिधी साकिब सय्यद
धुळे:- जिल्ह्यातील पिंपळनेर शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील बसस्थानक परिसरातील तायडे हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेल्या देगाव येथील २१ वर्षीय पूनम सोनू अहिरे या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी रक्त न देताच प्रसूती केल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला असून, या घटनेनंतर पिंपळनेरमध्ये रात्रभर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पूनम अहिरे यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी उपचारादरम्यान रक्ताची गरज असल्याचे सांगून सटाणा येथून रक्त आणण्यास सांगितले होते. मात्र, नातेवाईकांनी रक्त आणण्यापूर्वीच डॉक्टरांनी प्रसूती केली आणि त्यानंतर काही वेळातच पूनम यांची प्रकृती चिंताजनक बनली. परिस्थिती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. परंतु, रुग्णवाहिका येईपर्यंत पूनम यांचा मृत्यू झाल्याचा संशय नातेवाईकांना आला आणि त्यांनी रुग्णालयाबाहेर तीव्र संताप व्यक्त केला.
या घटनेची माहिती मिळताच देगाव येथील शेकडो ग्रामस्थ पिंपळनेरमध्ये दाखल झाले. संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी जोपर्यंत संबंधित डॉक्टरवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेत रुग्णालयासमोर रस्ता रोको आंदोलन केले. यादरम्यान रुग्णालयावर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. अखेर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर, रात्री उशिरा डॉक्टर तायडे यांच्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून पिंपळनेर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



