🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी राजेंद्र पवार
मिरज :- मिरजेत दूध संकलन केंद्रावर प्रशासनाची धडक कारवाई; १७८ लिटर गायीचे, ९८ लिटर म्हशीचे व ३८ लिटर स्किम्ड दूध आढळले अन्न व औषध प्रशासनाने दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेसाठी राज्यभर विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत सांगली जिल्ह्यातील मिरज व शिराळा तालुक्यांत विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली.मिरज तालुक्यातील मायाक्का दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली. यावेळी केंद्रावर १७८ लिटर कच्चे गायीचे दूध, ९८ लिटर कच्चे म्हशीचे दूध आणि ३८ लिटर स्किम्ड दूध आढळून आले. दूध संकलनाच्या आवश्यक नोंदी उपलब्ध नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले.तपासणीदरम्यान गायीच्या दुधातील क्रीम वेगळे करून म्हशीच्या दुधात मिसळले जात असल्याचा संशय प्रशासनाला आला. त्यामुळे दूध भेसळीच्या प्रकाराची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, प्रशासनाकडून पुढील तपासणी व कारवाई सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, सांगली शहरातील फतेसिंगराव नाईक सहकारी दूध उत्पादक संघातही तपासणी करण्यात आली. येथे १०४ किलो संशयास्पद व अवमानक दही आढळून आले. दह्याच्या लेबलवरही त्रुटी असल्याचे तपासणीत समोर आले.राज्यभर सुरू असलेल्या या विशेष मोहिमेत आतापर्यंत ७ हजार ३३२ लिटर दूध, १०४ किलो दही आणि ८८.४ किलो क्रीम असा एकूण अंदाजे २ लाख ५५ हजार ५९२ रुपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.दूध व दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, नागरिकांनीही दूध व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना गुणवत्ता, पॅकिंग, लेबल व संबंधित माहिती तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



