🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाइम🚨
प्रतिनिधी : राजेंद्र पवार
सांगली :- मिरज शहर आणि परिसरात नशेखोरांकडून सुरू असलेल्या हैदोसाने पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिरज शहरातील पंचायत समिती, मार्केट यार्ड तसेच बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी नशेखोर आणि संशयितांची गर्दी होत असल्याच्या तक्रारी असतानाच, मंगळवारी रात्री नशेच्या अमलाखाली असलेल्या दोघांनी चक्क एसटी बस अडवून चालक व वाहकावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. हल्ला सोडविण्यासाठी धावलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावरही चाकूने वार करण्यात आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
या हल्ल्यात एसटी वाहक महादेव बाबासाहेब शिंदे तसेच महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी कोंडीबा सुबराव सरगर गंभीर जखमी झाले असून, बसचालक किरकोळ जखमी झाला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयित नशेखोर तरुणांना ताब्यात घेतले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर ते जालना मार्गावर धावणारी एसटी बस रात्रीच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून जात असताना जनावर बाजार परिसरातून आलेल्या दोन तरुणांनी आपली दुचाकी बसच्या आडवी लावून बस अडवली. त्यानंतर चालकासोबत क्षुल्लक कारणावरून वाद घालत दोघांनी शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली.काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही तरुणांनी चालक व वाहकाला बेदम मारहाण केली. बसच्या काचा व समोरील भागाची तोडफोड केली. धारदार शस्त्राचा धाक दाखवत चालक व वाहकाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने मध्यस्थी करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. या झटापटीत पोलिस कर्मचारी सरगर यांच्या बरगडीला चाकूचा वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे एसटीमधील प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवासी भयभीत झाले. काही प्रवाशांनी जीवाच्या भीतीने बसमधून खाली उतरून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. बसचालकानेही परिस्थिती पाहून तेथून बाजूला होण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही संशयितांना तातडीने ताब्यात घेतले. जखमींना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.दरम्यान, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तसेच शासकीय रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि तपासाबाबत सूचना दिल्या.
रुग्णालयातही नशेखोरांचा गोंधळ?
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर तेथेही गोंधळ घालण्याचा प्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत आरडाओरड, धमकावण्याचे प्रकार झाल्याने रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेमुळे नशेखोरांना पोलिसांचा धाक उरला आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. काही मोजक्या पोलिस कर्मचाऱ्यांशी गुन्हेगारांचे असलेले कथित संबंध किंवा अनावश्यक सलगी यामुळे संपूर्ण पोलिस दलातील कर्तबगार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
‘ग्राउंड पोलिसिंग’ची गरज
मिरज शहरातील संवेदनशील भागांमध्ये रात्रीच्या वेळी गस्त वाढविणे, नशेखोरांवर कठोर कारवाई करणे, संशयित गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. केवळ कारवाई करून न थांबता नशेखोरीच्या मुळावर घाव घालण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण पोलिसिंगची गरज आहे.
भयमुक्त, नशामुक्त सांगली अभियानावरही प्रश्नचिन्ह?
सांगली जिल्ह्यात नशामुक्ती आणि भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी अभियान राबविले जात असतानाच दुसरीकडे नशेखोरांकडून सार्वजनिक ठिकाणी वाहनांची तोडफोड, मारामारी आणि पोलिसांवर हल्ल्याचे प्रकार घडत असल्याने प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.मिरजेसह जिल्ह्यात नशेखोरी आणि वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. नशेखोरांना कायद्याचा धाक आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देण्यासाठी आता ठोस ‘ग्राउंड पोलिसिंग’ची गरज आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.



