🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम
🚨
जिल्हा प्रतिनिधी – रमजान मुलानी
सांगली :- सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत रेकॉर्डवरील आरोपीकडून १ देशी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे, असा एकूण ६२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत रेकॉर्डवरील आरोपी मधुसुदन महेश मगदुम (वय २४, रा. गल्ली नं. ६, हसनी आश्रम, विश्रामबाग, सांगली) हा जुना धामणी रोड परिसरात कमरेला पिस्तूल खोचून थांबला असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने परिसरात निगराणी ठेवून संशयिताला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टमध्ये १ देशी बनावटीचे पिस्तूल, तर खिशात २ जिवंत काडतुसे आढळून आली. सदर अग्निशस्त्र बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना त्याच्याकडे नसल्याचे तपासात समोर आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१), (३)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे. जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे तसेच शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे करणाऱ्या इसमांवर अशी प्रभावी कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



