🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – संजय दिंडे
कोल्हापूर :- कोल्हापूर शहरात दुचाकी चोरी करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात जुना राजवाडा पोलिसांना मोठे यश आले आहे. चोरीची स्प्लेंडर विक्री करण्यासाठी आलेल्या ५५ वर्षीय शिवाजी मधुकर चव्हाण याला पोलिसांनी सिनेस्टाईल सापळा रचून जेरबंद केले. त्याच्या चौकशीत शहरातील विविध भागांतून चोरी केलेल्या तब्बल सहा मोटारसायकलींचा पर्दाफाश झाला असून, पोलिसांनी १ लाख ९५ हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच कोल्हापूर शहरात स्प्लेंडर मोटार सायकली चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी चोरीच्या घटनांचा छडा लावण्यासाठी गुन्हे शोध पथक सक्रिय केले होते.
दरम्यान दि.९ ऑगस्ट रोजी चोरीची स्प्लेंडर मोटार सायकल विक्री करण्यासाठी टिंबर मार्केट परिसरातील भाजी मंडईजवळ एक व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता परिसरात सापळा रचला काही वेळातच संशयित इसम दुचाकीसह तेथे दाखल झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर दुचाकी चोरीची असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
अधिक चौकशीदरम्यान संशयिताने कोल्हापूर शहरातील सबजेल-बिंदू चौक परिसर, जैन मंदिर-महाद्वार रोड, आझाद गल्ली आणि कामगार चाळ-रेसकोर्स नाका परिसरातून मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी त्याच्या ताब्यातून एकूण सहा चोरीच्या मोटार
सायकली जप्त केल्या. या कारवाईमुळे जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील सहा गुन्ह्यांचा छडा लागला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या सहा मोटार सायकलींची एकूण किंमत १ लाख ९५ हजार रुपये आहे.चोरीच्या दुचाकींची
विक्री करण्यापूर्वीच पोलिसांनी आरोपीला पकडल्याने मोठी कारवाई झाली आहे.आरोपी शिवाजी मधुकर चव्हाण याला दि. ९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून, त्याला १२ ऑगस्टपर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या नेतृत्वा-
खाली ही कारवाई करण्यात आली.गुन्हे शोध पथकातील अमर पाटील, प्रशांत घोलप, प्रविण सावंत, मोहन लगारे, स्वप्निल कांबळे आणि प्रितम सूर्यवंशी यांनी कारवाईत सहभाग घेतला.या कारवाईमुळे शहरातील दुचाकी चोरीच्या टोळीचा आणखी तपास सुरू झाला असून आरोपीकडून चोरीच्या इतर घटनांची माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.



