🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी अजगरभाई मुल्ला
चाळीसगाव :- मध्यरात्रीच्या वेळी घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चाळीसगाव येथील मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट क्र. ०१ यांनी आरोपी अशोक सदाशिव जाधव यास १ वर्षाच्या सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात ५ पैकी ३ साक्षीदार फितूर झाले असतानाही न्यायालयाने पीडित महिलेच्या आणि तपास अधिकाऱ्याच्या साक्षीवर विश्वास ठेवत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी अशोक सदाशिव जाधव याने मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ४३६/२०२२ (फौजदारी खटला क्र. ५०/२०२३) अन्वये भा.दं.वि. चे कलम ३५४ व ४५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
३ साक्षीदार फितूर, तरीही आरोपीला शिक्षा:
सदर खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, त्यापैकी ३ साक्षीदार फितूर (Hostile) झाले. असे असूनही फिर्यादी महिला आणि तपास अधिकारी पंकज पंढरीनाथ पाटील यांची साक्ष अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. मा. न्यायालयाने या दोघांच्या साक्षी ग्राह्य धरून आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाचा निकाल:
भा.दं.वि. कलम ३५४ अंतर्गत आरोपीस ०१ वर्ष सश्रम कारावास आणि १,००० रुपये नुकसान भरपाई (फिर्यादीस देणे).
भा.दं.वि. कलम ४५२ अंतर्गत आरोपीस ०१ वर्ष सश्रम कारावास आणि २,००० रुपये नुकसान भरपाई (फिर्यादीस देणे).
सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद:
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता रमेश खंडु माने यांनी जोरदार बाजू मांडली. त्यांनी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे (Precedents) न्यायालयात सादर केले.
त्यांना सहाय्यक सरकारी अभियोक्ता राकेश प्रभाकर चौधरी व शंतनू/शशिकांत शिवाजी माने यांनी सहकार्य केले. तसेच ॲड. मयुर अरूण निकम, ॲड. श्री. मयुर लक्ष्मण कुमावत, पैरवी अधिकारी पो.कॉ. ३३०२ कुंदन अडकमोल (मेहुणबारे पोलीस स्टेशन), केसवॉच पोहेकॉ. ३१५५ सुनिल यशवंत खैरनार व पो.कॉ. १२३५ जगदीश पाटील (चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन) यांनी मदत केली.
सदर कारवाईस पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ व पोलीस उप अधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड साहेब यांचे सहकार्य लाभले.



