🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
जिल्हा प्रतिनिधी- साईनाथ खंडेराय
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत कुंडलवाडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शहरातील गोडाऊन फोडून तांबा-पितळी भांडी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा कुंडलवाडी पोलिसांनी पर्दाफाश करून चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीला गेलेला 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत सुमारे 47 हजार रुपये आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी कुंडलवाडी येथील भांड्यांच्या गोडाऊनच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तांबा-पितळी भांडी चोरून नेली होती. याप्रकरणी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 93/2026, कलम 331(3), 305 भारतीय न्याय संहिता, 2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी कुंडलवाडीचे प्रभारी अधिकारी यांना आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून तपासाला सुरुवात केली.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी सय्यद गफ्फार बीबी, पोपटसिंग उर्फ पोपटसिंग इब्राहिम, येनकवा कृष्णा अम्मा आणि गंगामणी सायबू बीगी यांना ताब्यात घेण्यात आले. चौघांनी संगनमत करून कुंडलवाडी येथील तांबा-पितळी भांडी चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून ₹47,000 किमतीचा चोरीचा 100 टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, तसेच चोरीचा मुद्देमाल कोठे विकण्यात येत होता, याबाबत कुंडलवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. तपास पथकात पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच महिला अंमलदार आणि होमगार्ड यांचा सहभाग होता.
कुंडलवाडी पोलिसांच्या या कारवाईमुळे गोडाऊन फोडून चोरी करणाऱ्या टोळीवर मोठा अंकुश बसला असून, नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.



