🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
जिल्हा विशेष प्रतिनिधी- साईनाथ खंडेराय
बिलोली : शहरात वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांविरोधात बिलोली पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील प्रमुख नरसी–डीचपल्ली महामार्गावर पोलिसांनी विशेष वाहतूक तपासणी मोहीम राबवत नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली.
मा. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन आणि पोलीस उपविभागीय अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली, बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्यासह पोलीस पथकाने शहरातील चौकाचौकात वाहनांची तपासणी केली.
या कारवाईदरम्यान विनानंबर प्लेट वाहने, विनापरवाना वाहनचालक, विमा नसलेली वाहने, मद्यप्राशन करून वाहन चालविणारे, सीटबेल्ट न लावणारे, फॅन्सी नंबर प्लेट वापरणारे आणि ट्रिपल सीट प्रवास करणारे वाहनचालक पोलिसांच्या रडारवर आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, तपासणीदरम्यान हेल्मेटचा वापर न करता दुचाकी चालविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आले. त्याहून गंभीर बाब म्हणजे काही अल्पवयीन मुलांच्या हातात दुचाकी देऊन त्यांना भरधाव वेगाने वाहन चालविताना आढळून आले. अशा प्रकारामुळे केवळ चालकाचाच नव्हे, तर इतर निष्पाप नागरिकांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.
पोलिसांची कारवाई सुरू असल्याचे लक्षात येताच काही बेशिस्त वाहनचालकांनी पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी मागच्या मार्गाने वाहन वळवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनेक नियमभंग करणारे चालक कारवाईच्या कचाट्यात सापडले.
वाहतूक नियम हे केवळ दंड टाळण्यासाठी नसून स्वतःचा आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत. त्यामुळे बिलोली शहरात नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांनी आता सावध होण्याची गरज आहे. हेल्मेट, सीटबेल्ट, वाहनाचा परवाना, विमा, योग्य नंबर प्लेट आणि वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात अशीच कडक कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांच्या या मोहिमेतून मिळत आहे.
कारवाईत पोलीस पथकाचा सक्रिय सहभाग
या विशेष वाहतूक कारवाईमध्ये पीएसआय शिवराज लोखंडे, पोलीस कर्मचारी कटारे तसेच गृहरक्षक दलाचे होमगार्ड यांनी सक्रिय सहभाग घेतला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या समवेत पथकाने शहरातील विविध चौकांमध्ये वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली.
बिलोली शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून, नियम तोडाल तर कारवाईला सामोरे जावेच लागेल, असा स्पष्ट संदेश या मोहिमेतून देण्यात आला आहे.
दरम्यान, अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी देणाऱ्या पालकांनीही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. मुलांच्या हट्टापेक्षा त्यांचा जीव महत्त्वाचा असून, एक छोटीशी चूक आयुष्यभराची दुर्घटना ठरू शकते.



