१०६ सिलेंडर, भारत पेट्रोलियमचा टँकरसह ४ वाहने जप्त; महाराष्ट्र–गुजरात सीमेवर अवैध गॅस पुरवठ्याचे मोठे जाळे उघड
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी साकिब सय्यद✍️
धुळे :- जिल्ह्यातील पिंपळनेर–दहिवेल राष्ट्रीय महामार्ग परिसरात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे एक मोठी धडक कारवाई केली आहे. अवैधरित्या एलपीजी गॅसचा साठा करून व्यावसायिक हॉटेलांना मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात प्रशासनाला यश आले आहे. या कारवाईदरम्यान प्रशासनाची चाहूल लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळावरून भारत पेट्रोलियमचा गॅस टँकर, तीन चारचाकी वाहने, १०६ व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, या रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रासह गुजरातपर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशी झाली कारवाई…
पिंपळनेर–दहिवेल महामार्गावरील ‘बालाजी हॉटेल’च्या पाठीमागील परिसरात अवैध गॅस रिफिलिंगचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार अधिकार पेंढारकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने आणि पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय नामदेव सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप संसारे यांच्या पथकाने संयुक्तपणे या ठिकाणी छापा टाकला.
मोठ्या टँकरमधून चालत होता काळाबाजार
प्राथमिक तपासानुसार, भारत पेट्रोलियमच्या मोठ्या मुख्य टँकरमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या साहाय्याने व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात होता. त्यानंतर हे सिलेंडर महामार्गालगतच्या हॉटेलांना तसेच महाराष्ट्र–गुजरात सीमेवरील काही व्यावसायिक आस्थापनांना चोरट्या मार्गाने विकले जात होते. या संपूर्ण प्रकरणामागे एक मोठे आर्थिक रॅकेट कार्यरत असण्याची दाट शक्यता असून तपास यंत्रणा आता त्या दिशेने सखोल तपास करत आहेत.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व वाहने:
कारवाई दरम्यान पोलीस आणि महसूल विभागाने खालील वाहने आणि साहित्य जप्त केले आहे:
भारत पेट्रोलियम टँकर: (KA-01 AE-6365)
महिंद्रा बोलेरो: (GJ-19 Y-8316)
महिंद्रा बोलेरो: (GJ-06 AU-3662)
मारुती सुझुकी: (MH-18 BG-8667)
इतर साहित्य: १०६ व्यावसायिक गॅस सिलेंडर, गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी इलेक्ट्रिक मोटार, पाईप व इतर उपकरणे.
या अधिकाऱ्यांनी बजावली कामगिरी
या यशस्वी संयुक्त कारवाईत महसूल विभागाचे पुरवठा निरीक्षक विशाल कांगणे, जयवंत पाटील, सुभाष गिरी, गणेश माळी, विकास पाटील, वाहनचालक मुकेश विसपुते यांनी सहभाग घेतला. तसेच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीएसआय संदीप संसारे, पीएसआय राजेंद्र मोरे, एएसआय अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल पंकज वाघ आणि दावल सैदाणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पुढील तपास सुरू
जप्त केलेली सर्व वाहने व साहित्य सध्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात असून, या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय संदीप संसारे करीत आहेत. सध्या फरार आरोपींचा शोध सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, हा काळाबाजार किती दिवसांपासून सुरू होता आणि गुजरात-महाराष्ट्रातील कोणत्या हॉटेलांना हा पुरवठा केला जात होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.
प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे महामार्ग परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, भविष्यातही अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.



