🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी रायप्पा मंडले
लातूर: पोलीस भरतीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी तब्बल ३० वर्षांपासून न्यायालय आणि पोलीस प्रशासनाला गुंगारा देत फरार असलेल्या आरोपीला अखेर लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बीड जिल्ह्यातून अटक केली आहे. दत्तू भगवान डावकरे (वय ७० वर्षे, मूळ रा. मित्रनगर, लातूर, सध्या रा. अंजनपूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
गंभीर स्वरूपाच्या प्रलंबित गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत लातूर पोलिसांना हे मोठे यश मिळाले आहे.
नेमके प्रकरण काय होते?
सन १९९४ मध्ये आरोपी दत्तू डावकरे याने एका फिर्यादीच्या मुलाला पोलीस दलात भरती करून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्याने फिर्यादीकडून ६,५०० रुपये घेतले होते. मात्र, मुलाची भरती झाली नाही. जेव्हा फिर्यादीने आपले पैसे परत मागितले, तेव्हा आरोपीने केवळ २,५०० रुपये नगद परत केले आणि उर्वरित ४,००० रुपयांसाठी बँक चेक दिला.
हा चेक बँकेत जमा केला असता, आरोपीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित (बाउन्स) झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार १९९५ मध्ये आरोपीविरुद्ध गु.र.नं. ३५/१९९५, कलम ४२०, ४०६ (भारतीय दंड संहिता) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
असा झाला फरार
गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरुवातीला आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच तो पोलिसांना चकमा देऊन फरार झाला. त्यानंतर तो सतत आपले वास्तव्याचे ठिकाण बदलत राहिला. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अनेकदा अटक वॉरंट, नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) आणि जाहीरनामा जारी केला होता. परंतु, तो मिळून येत नसल्यामुळे अखेर हा खटला तात्पुरता निष्क्रिय ठेवण्यात आला होता.
गुन्हे शाखेने बीडमध्ये आवळले आवळले पाश
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपी शोधण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान विशेष पथकातील पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे यांना आरोपी बीड जिल्ह्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत लपून राहत असल्याची अत्यंत गोपनीय माहिती मिळाली.
माहितीची खातरजमा होताच लातूर पोलिसांनी बीडमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने युसुफवडगाव हद्दीतून आरोपी दत्तू डावकरे याला ताब्यात घेतले. त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत (Jail) केली आहे.
कारवाई करणारी टीम
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक संजय भोसले, पोलीस अंमलदार दत्तात्रय शिंदे, चंद्रकांत केंद्रे आणि युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अरुण मोरे यांच्या पथकाने केली.



