🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी संदीप अहिरे
धुळे : – पांझरा नदी पात्रातून रेती वाहतुकीची वाहने विनाअडथळा जाऊ देण्यासाठी आणि दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कुसुंबा सज्याचे तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व त्यांच्या दोन खाजगी साथीदारांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) धुळे येथील गांधी पुतळ्याजवळ रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार यांचा बांधकाम साहित्य वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्या मालकीच्या दोन वाहनांमधून पांझरा नदी पात्रातून रेती वाहतूक केली जाते. या वाहतुकी दरम्यान खाजगी इसम प्रदीप विश्वास पाटील याने तक्रारदारास गाठून, “मी तलाठी मोहित वारे यांचे काम पाहतो. तुम्हाला आमच्या गावातून रेती भरायची असेल तर तलाठी यांना भेटावे लागेल, अन्यथा ते तुमची वाहने अडवून कारवाई करतील,” अशी धमकी दिली होती.
त्यानंतर २५ सप्टेंबर २०२६ रोजी प्रदीप पाटील याने तलाठी मोहित वारे यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडे प्रत्येक गाडीमागे २५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच यापूर्वी वाहने नेल्याप्रकरणी अवैध गौण खनिज वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून पैसे घेऊन २८ सप्टेंबर रोजी गांधी पुतळा, धुळे येथे भेटण्यास सांगितले.
तडजोड आणि सापळा कारवाई
तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (नाशिक) कडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने २८ सप्टेंबर २०२६ रोजी पडताळणी केली असता, तलाठी मोहित वारे यांनी २५,००० रुपयांवरून तडजोड करत २०,००० रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच खाजगी इसम प्रदीप पाटील याने लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार धुळे येथील गांधी पुतळा परिसरात सापळा रचण्यात आला. कारवाई दरम्यान तलाठी मोहित बाबासाहेब वारे यांनी तक्रारदाराकडून २०,००० रुपयांची रक्कम स्वीकारून ती तात्काळ खाजगी इसम स्वप्निल रामकृष्ण देसले याच्याकडे सुपूर्द केली. देसले याने ती रक्कम ताब्यात घेताच एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी धुळे येथील आझादनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ७, ७-अ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आरोपींची नावे:
मोहित बाबासाहेब वारे (ग्राम महसूल अधिकारी, सजा कुसुंबा, अतिरिक्त कार्यभार कौठाळ, ता.जि. धुळे)
प्रदीप विश्वास पाटील (खाजगी इसम, रा. कौठाळ, ता.जि. धुळे)
स्वप्निल रामकृष्ण देसले (खाजगी इसम, रा. वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे)
कारवाई करणारे पथक
सदर कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व श्रीमती कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सुवर्णा हांडोरे (सापळा अधिकारी), वाचक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत (पर्यवेक्षक अधिकारी), धुळे एसीबीच्या पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल (तपास अधिकारी) तसेच पोलीस अंमलदार संदीप हांडगे आणि सुरेश चव्हाण यांच्या पथकाने केली.
नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक किंवा खाजगी इसम लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याशी संपर्क साधावा.
टोल फ्री क्रमांक: १०६४
व्हॉट्सॲप क्रमांक: ९९३०९९७७०० / ९५४५०३१०६४
वेबसाईट: acbmaharashtra.gov.in



