🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी साईनाथ खंडेराय
नांदेड: नांदेड शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील श्री लॉजसमोर पूर्ववैमनस्यातून एका ४२ वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने (खंजीरने) वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रविवारी, १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे ११:३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शेख सिराजोद्दीन शेख बद्रोद्दीन (वय ४२, रा. मिलगेट, नांदेड) आणि सय्यद एजाज सय्यद बाबर (वय ३२, रा. मिलगेट रोड, नांदेड) यांच्यात जुन्या वादावरून भांडण झाले होते. या भांडणादरम्यान आरोपी नितेश अग्रवाल याच्या सांगण्यावरून सय्यद एजाज याने धारदार खंजीरने सिराजोद्दीन यांच्यावर वार करून त्यांचा निघृण खून केला.
पोलीस पथकाची तात्काळ कारवाई
घटनेची माहिती मिळताच वजिराबाद पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. मुख्य आरोपी सय्यद एजाज सय्यद बाबर याला पोलिसांनी घटनास्थळावरूनच रंगेहात ताब्यात घेतले. तर फरार झालेला दुसरा आरोपी नितेश गोपालदास अग्रवाल (वय ५१, रा. शिवशक्ती नगर रोड, नांदेड) याला गुन्हे शोध पथकाने गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे अवघ्या काही वेळात शोधून काढत अटक केली.
गुन्हा दाखल व पुढील तपास
या प्रकरणी वजिराबाद पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०३(१), ३(५) तसेच शस्त्र कायद्यांतर्गत (कलम ४, २५, २७) गुन्हा नोंदवण्यात आला आहे (गुन्हा रजि. क्र. ०४१२/२०२६).
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, पोलीस उप अधीक्षक रामेश्वर वैजंने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे, विठ्ठल दुरपडे व गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी पार पाडली. वजिराबाद पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.



