🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी साईनाथ खंडेराय
नांदेड: जिह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलली असून सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए (MPDA) कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारला आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या सूचनेनुसार, वजिराबाद येथील सराईत गुन्हेगार किशन राजू कुरील याला एक वर्षासाठी छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पोलीस अभिलेखानुसार किशन राजू कुरील (वय – बेकार, रा. गायत्री मंदिराजवळ, वजिराबाद, नांदेड) याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, अवैध शस्त्र बाळगणे व वापरणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी आणि दरोडा यांसारख्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यापूर्वी त्याच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे पोलीस ठाणे वजिराबादचे प्रभारी अधिकारी यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी या प्रस्तावातील कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता केली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी या प्रस्तावाची शिफारस नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे केली. प्राप्त प्रस्तावाच्या आधारे जिल्हादंडाधिकाऱ्यांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी किशन कुरील याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश पारित केले. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करत आरोपीला ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगर कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
सन २०२६ मधील १६ वी कारवाई
नांदेड पोलीस दलाने ‘टू प्लस योजने’अंतर्गत सक्रिय व सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली असून चालू वर्ष २०२६ मध्ये करण्यात आलेली ही १६ वी स्थानबद्धतेची कारवाई आहे. याशिवाय १५० हून अधिक सराईत गुन्हेगारांवर विविध कायद्यांन्वये प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
नांदेडचे जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांनी माहिती देताना सांगितले की, “सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा पोहोचवणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मोहीम अशीच सुरू राहील आणि सामान्य नागरिकांची सुरक्षा हेच पोलीस प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल.”



