🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी देवराव मराठे
शहादा :- शासकीय वैद्यकीय बिलाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर, नाशिक येथील वरिष्ठ सहाय्यक रामचंद्र नरसू माकरे यांना जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक यांनी दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी लोकसेवक रामचंद्र नरसू माकरे, वरिष्ठ सहाय्यक, वर्ग-३, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर, नाशिक यांनी तक्रारदार यांच्या शासकीय वैद्यकीय बिलाची रक्कम बँक खात्यात जमा करण्यासाठी दिनांक १६ सप्टेंबर २०१४ रोजी तक्रारदाराकडे ३ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती दोन हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.
या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी माकरे हे राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, सातपूर येथील वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती कक्षासमोरील हॉलमध्ये तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना आढळून आले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाणे, नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास पूर्ण करून तपासी अधिकाऱ्यांनी जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे ०९ एप्रिल २०१५ रोजी दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा विशेष केस क्रमांक १९/२०१५ असा होता.
सदर खटल्याची सुनावणी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. अमित विनायक खारकर, नाशिक यांच्या समोर झाली. न्यायालयाने आरोपी रामचंद्र नरसू माकरे यांना भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ मधील कलम ७ अन्वये दोषी ठरवून ६ महिने कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षा, तसेच कलम १३(२) अन्वये १ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
या कारवाईत भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, तसेच प्रदीप मैराळे, अपर पोलीस अधीक्षक आणि श्रीमती कविता फडतरे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रूपाली खांडवी पोलीस निरीक्षक संबंधित अधिकाऱ्यांनी कामकाज केले.
खटल्यातील कामकाजासाठी व कोर्ट पैरवी अंमलदार प्रदीप काळोगे तसेच पोलीस हवालदार यांनी सहकार्य केले. तसेच सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता शिरीष कडवे व सचिन
गोरवाडकर यांनी काम पाहिले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणी खासगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. नागरिकांच्या सोयीसाठी नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार व जळगाव, तसेच नाशिक परिक्षेत्रीय कार्यालय येथील संपर्क क्रमांक तसेच टोल फ्री क्रमांक विभागाने प्रसिद्ध केला आहे.


