🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी – नारायण कांबळे✍️
कोल्हापूर:- इचलकरंजी, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धाडसी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ, एक मोबाईल हँडसेट आणि होंडा सिटी कार असा एकूण ६ लाख १८ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई दि. ६ जुलै २०२६ रोजी पहाटे ५.०५ वाजण्याच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी येथील वैरण बाजार रोडवर करण्यात आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३९/२०२६ अन्वये बीएनएस कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ चे कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये प्रतिबंधित गुटखा, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखूजन्य गुटखा, व्हिवो कंपनीचा मोबाईल तसेच एमएच-०२-बीडी-८१२१ क्रमांकाची राखाडी रंगाची होंडा सिटी कार यांचा समावेश आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम गजबरसाब सनदी (ब. नं. १९८७), शिवाजीनगर पोलीस ठाणे, इचलकरंजी यांनी फिर्याद दिली आहे. त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज विभाग) आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने, पो.हे.कॉ. अनिल चव्हाण तसेच पोलीस अंमलदार सद्दाम सनदी, विकास चौगुले, शिरीष कांबळे, प्रमोद चव्हाण, स्वप्निल मिसाळ आणि राजकुमार पाटील यांनी सहभाग घेतला.
प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतूक व विक्रीविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.



