नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

तरुणांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण झाली तर देशाची प्रगती वेगाने होईल :- पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे

DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी अकिल शहा

साक्री: तरुणांमध्ये संविधानिक मूल्यांची जाणीव आणि मूलभूत कर्तव्यांची भावना दृढ झाली तर देशाची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. संविधानाने दिलेले अधिकार महत्त्वाचे असले तरी त्यासोबत असलेली कर्तव्ये पाळणेही तितकेच गरजेचे आहे. जबाबदार नागरिक म्हणून राष्ट्र घडविण्यात तरुणांची भूमिका महत्त्वाची असून त्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडू शकते असे प्रतिपादन धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.
शिवशाही फाउंडेशन भारत, सुयोग फाउंडेशन साक्री आणि विद्या विकास मंडळाचे सी.गो. पाटील महाविद्यालय साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘युवा संवाद २०२६’ या कार्यक्रम प्रसंगी युवकांशी ते संवाद साधत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष चंद्रजीत सुरेश पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक बाळाराम माडकर, डीवायएसपी संजय बांबळे, पोलीस निरीक्षक दीपक वळवी, सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे आणि उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न, करिअरच्या संधी, स्पर्धा परीक्षा तसेच व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विविध विषयांवर या संवादातून मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पुढे म्हणाले की, यश कोणाचीही मक्तेदारी नसून ते प्रत्येकासाठी खुले आहे. स्वतःची ओळख निर्माण करून सकारात्मक विचारांनी आयुष्य जगणारा प्रत्येक तरुण यशस्वी होऊ शकतो. आयुष्यात चांगल्या मित्रांची संगत आणि व्यसनांपासून दूर राहण्याची सवय ही व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कुटुंबात एक जरी व्यसनी व्यक्ती असला तर संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते परंतु एक सद्विचारी आणि संस्कारशील व्यक्ती असली, तरी संपूर्ण पिढी योग्य दिशेने घडू शकते. त्यामुळे चांगले मित्र आणि चांगले विचार हीच खऱ्या अर्थाने माणसाची मोठी संपत्ती आहे.
विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात स्पष्ट ध्येय ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास कोणतेही यश दूर नाही. तरुणांनी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून सकारात्मक मार्गाने जीवन जगले तर देशाची उभारणी अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतात चंद्रजीत पाटील यांनी स्पर्धा परीक्षा हा केवळ नोकरी मिळवण्याचा मार्ग नसून समाजासाठी काम करण्याची आणि देशाच्या प्रगतीत योगदान देण्याची मोठी संधी आहे, असे प्रतिपादन केले. आजच्या स्पर्धात्मक युगात नियोजनबद्ध अभ्यास, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर विद्यार्थी निश्चितपणे यश मिळवू शकतात, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द आणि परिश्रमांच्या बळावर मोठी पदे मिळवून यशाची नवी उदाहरणे निर्माण केली आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
‘युवा संवाद’सारखे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून त्यांना योग्य दिशा देतात. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत, त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत आणि अपयश आले तरी खचून न जाता संघर्ष करत राहावे, कारण आजचा संघर्षच उद्याचे यश घडवतो, असे आवाहन करून त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक बाळाराम माडकर आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनीही मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुयोग फाउंडेशनचे सचिव डॉ. शुभम गौड यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश, युवकांना मार्गदर्शनाची गरज आणि समाजातील सकारात्मक परिवर्तनात तरुणांची भूमिका याविषयी त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमास २८० विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहिते यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निखिल गौड, महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
12:33 am, September 21, 2026
28°C
साफ आकाश
71 %
4 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:19 am
Sunset: 6:28 pm
Translate »
error: Content is protected !!