DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी रविंद्र गवळे – नंदुरबार
शहादा तालुक्यातील बामखेडा त.त.येथील ग्रामीण भागातील ग्राम विकास संस्थेचे कला आणि विज्ञान महाविद्यालय व मुंबई येथील नावलौकिक प्राप्त डॉ.होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी यांच्यात ‘कोल्याबोरेशन इन ए.आय अँड स्किल एनव्हांसमेंट कोर्सेस’ या संदर्भात सामंजस्य करार संपन्न झाला. पीएमउषा या केंद्र सरकारच्या योजना प्राप्त करणाऱ्या दोन्ही संस्थांमधला हा सामंजस्य करार दोघांना फायदेशीर व विद्यार्थी हिताचा आहे. विकसित तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व कौशल्य प्रधान शिक्षण ही काळाची गरज लक्षात घेऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बदलत्या शैक्षणिक प्रवाहात सामावून घेण्याच्या दृष्टीने परिसरासाठी हा करार महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई व बामखेडा त.त. महाविद्यालयात ए.आय संबंधित विविध सर्टिफिकेट कोर्सेस राबविणे, कौशल्य प्रधान कार्यक्रम राबविणे, विविध विषयांवर चर्चासत्रे, कृतीसत्रे, प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे व दोन्ही संस्थांमध्ये ज्ञान- तंत्रज्ञानाचे आदान-पदान करणे अपेक्षित आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक प्रसंगी मुंबई येथे जाऊन शहरी अनुभव घेतील तर मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी बामखेडा त.त. या ग्रामीण परिसरात येऊन ग्रामीण अनुभव घेतील. असे विद्यार्थी व प्राध्यापकांचे आदान प्रदान अपेक्षित आहे. या करारामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना संपूर्ण संगणक साक्षरता, डेटा ॲनालिसिस, डिजिटल मार्केटिंग, कम्युनिकेशन्स स्किल्स, उद्योजकता विकास, तांत्रिक कौशल्य निर्मिती व विकसन, विविध प्रकल्पांचे मार्गदर्शन, करियर गायडन्स ,तज्ञ रिसोर्सेस ची उपलब्धता, प्राध्यापकांसाठी विविध ट्रेनिंग कोर्सेस असे विविध उपक्रम राबविले जाऊन ग्रामीण टॅलेंटला योग्य तो वाव देण्यात येईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही आधुनिक संगणक क्षेत्रातील क्रांती ठरत आहे. यापुढे जग आर्टिफिशल इंटेलिजन्स यावर प्रामुख्याने चालेल .त्याचे शिक्षण बामखेडे यासारख्या ग्रामीण परिसरात प्राप्त होऊन एक नवीन शैक्षणिक क्रांती घडेल म्हणून परिसरातील विद्यार्थी ,पालक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र शासनाच्या पीएम उषा या योजनेतून प्राप्त होणाऱ्या पाच कोटी रुपयांच्या अनुदानाचा योग्य तो विनियोग करण्याची संधी सामंजस्य कराराने मिळणार असल्याने संस्थेचे अध्यक्ष डॉ .काशिनाथ भाई चौधरी, उपाध्यक्ष श्री. पी. बी. पटेल, सचिव श्री. बी. व्ही. चौधरी यांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्राम विकास संस्थेचे संस्थाचालक आणि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांच्या प्रेरणेने सामंजस्य करार पारित झाला.संस्थेच्या वतीने महाविद्यालयाचे समन्वयक सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.एस. पी. पाटील, प्राचार्य डॉ. एच. एम.पाटील व पीएम उषाचे नोडल ऑफिसर डॉ.वाय. आर. पाटील तसेच विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास पाद्ये यांच्या करारावर स्वाक्षऱ्या आहेत. सदर सामंजस्य करार म्हणजे बामखेडा परिसराच्या दृष्टीने एक नवी वाटचाल ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



