🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर:- दि. ८ ऑगस्ट : हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथील खळबळजनक फायरिंग प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या काही दिवसांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत देशी बनावटीचे पिस्तूल (अनधिकृत रिव्हॉल्वर) व ३ जिवंत राऊंड असा एकूण ५१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.
फायरिंगमध्ये युवक गंभीर जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर रोड, साईनगर, कबनूर येथे निलेश निशिकांत कांबळे (वय २० रा. कोल्हापूर रोड,साई नगर कबनूर) हा युवक उभा असताना त्याच्यावर अनधिकृत पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला. आरोपीने झाडलेली गोळी निलेशच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटातून आरपार जात पाठीमागील भागात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.
जखमी युवकावर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून तपास सुरू केला.
शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी गुन्हा क्रमांक ६४२/२०२६ नोंद करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५(बी), २४० तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३ , २५(९) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल आणि दुसरा संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला.
एलसीबीची गोपनीय माहितीवर कारवाई
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विशेष पथक तयार केले. तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, फायरिंगमध्ये वापरलेले पिस्तूल दुसरा आरोपी शुभम दीपक सूर्यवंशी (वय २५, रा. साईनगर, कोल्हापूर रोड, कबनूर) हा लपविण्याच्या तयारीत आहे.
त्यानुसार सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने सापळा रचून शुभम सूर्यवंशी याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यातील शस्त्र लपवून ठेवल्याची कबुली दिली.
पिस्तूल व जिवंत काडतुसे हस्तगत
आरोपीच्या सांगण्यावरून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल व ३ जिवंत राऊंड हस्तगत केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत ५१,५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या कारवाईमुळे फायरिंग प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला असून, पुढील तपासासाठी आरोपींना शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
तपासात आतापर्यंत खालील आरोपी निष्पन्न झाले आहेत:
निलेश निशिकांत कांबळे (वय २०), रा. कोल्हापूर रोड, साईनगर, कबनूर, ता. हातकणंगले
पोलिसांकडून या गुन्ह्यामागील नेमके कारण, पूर्ववैमनस्य आणि अन्य साथीदारांचा सहभाग याबाबत सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, व पोलीस अंमलदार विनायक चौगुले, वसंत पिंगळे, विशाल चोगुले, अनिकेत मोरे, सचिन जाधव, सागर चौगले, सतीश सूर्यवंशी आणि अरुण धनगर यांचा सहभाग होता.



