🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – नारायण कांबळे
कोल्हापूर :— कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध शस्त्रनिर्मिती आणि तस्करीविरोधात मोठी कारवाई करत देशी बनावटीचे पिस्तुल, २८ जिवंत राऊंड, गन पावडर आणि पिस्तुल बनविण्यासाठी वापरले जाणारे सुटे साहित्य असा एकूण ७४,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी तुषार लक्ष्मण येरूडकर (वय २४, रा. दत्तानगर गल्ली नं. १०, कबनूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रांची निर्मिती, विक्री व हस्तांतरण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस अंमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.
कारवाईदरम्यान पथकाला तुषार येरूडकर हा बेकायदेशीर पिस्तुल आणि जिवंत राऊंड घेऊन कबनूर परिसरात फिरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. तत्काळ सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत धक्कादायक खुलासा
सुरुवातीला आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने दावतनगर, कबनूर येथे भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेत लेथ मशीनच्या सहाय्याने पिस्तुल बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला.
छाप्यात पोलिसांना खालील साहित्य आढळून आले:
१ देशी बनावटीचे पिस्तुल
हा सर्व मुद्देमाल बेकायदेशीररीत्या कोणताही परवाना न घेता तयार केला जात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
पिस्तुल बनविण्याचा प्रयत्न फसला
जप्त करण्यात आलेल्या सुट्या पार्ट्सची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीने पिस्तुल तयार करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्याला त्यात पूर्ण यश आले नव्हते, अशी माहिती दिली. तरीही हा प्रकार गंभीर असून अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.
पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून, या शस्त्रनिर्मितीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस अंमलदार विनायक चौगुले, विशाल चौगुले, अनिकेत मोरे, सचिन जाधव, वसंत पिंगळे, सागर चौगुले, सतीश सूर्यवंशी आणि अरुण धनगर यांनी सहभाग घेतला.



