🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी अजगरभाई मुल्ला
चाळीसगाव :- चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ येथे घरगुती वादातून एका इसमाची डोक्यात सायकलचा हवा भरण्याचा पंप मारून व दोरीने गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी घडली. या प्रकरणी मयत व्यक्तीच्या पत्नी आणि मुलावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करणसिंग रामसिंग वंजारी (वय ४५ वर्षे, रा. आंबेहोळ, ता. चाळीसगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत करणसिंग वंजारी यांना पत्ते खेळण्याचे व दारूचे व्यसन होते. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास त्यांनी गावातील एका इसमाकडे गहाण ठेवलेली गाडी सोडवण्यासाठी पत्नी अरुणाबाई यांच्याकडे पैशांची मागणी केली. पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद व झटापट झाली. या वादातून रागाच्या भरात मुलगा विशाल करणसिंग पवार (वंजारी) याने वडिलांच्या डोक्यात सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप मारला. त्यामुळे करणसिंग हे खाली कोसळले. त्यानंतर पत्नी अरुणाबाई व मुलगा विशाल या दोघांनी मिळून नायलॉनच्या दोरीने करणसिंग यांचा गळा आवळून त्यांना जीवे ठार मारले.
घटनेची माहिती मिळताच आंबेहोळचे पोलीस पाटील रमेश चरणसिंग राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना खबर दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली व संशयितांना ताब्यात घेतले.
पोलीस पाटील रमेश राठोड यांच्या फिर्यादीवरून संशयित पत्नी अरुणाबाई करणसिंग वंजारी आणि मुलगा विशाल करणसिंग पवार (वंजारी) यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.



