🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी कैलास माळी
शिरपूर : शिरपूर तालुक्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यश संपादन करणाऱ्या सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ‘पत्रकार सेवा संघ शिरपूर’च्या वतीने आयोजित या तालुकास्तरीय गुणगौरव सोहळ्यात तब्बल २०० गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा विशेष सन्मान करण्यात आला.
श्री लक्ष्मी लॉन्स येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसटी आगाराचे महेंद्र पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिरपूर पोलीस स्टेशनचे पीएसआय महाजन साहेब, तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, एसटी डेपोचे सहाय्यक वाहक निरीक्षक मनोज पाटील, कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सारिका रंधे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष आशिष अग्रवाल, राष्ट्रवादीचे बाळकृष्ण पाटील, ॲड. श्याम पाटील, प्राचार्य सचिन पाटील, संस्थापक अध्यक्ष चंद्रवदन गुजराती, अध्यक्ष युवराज पाटील, सौ. सुरेखा गुजराती आणि सौ. प्रेरणा रोकडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार सेवा संघाचे सहसचिव भरत रोकडे यांनी केले, तर प्रदेशाध्यक्ष विजय चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याची एक अनोखी पद्धत राबवण्यात आली. प्रत्येकी १० विद्यार्थी व १० विद्यार्थिनींच्या सत्कारानंतर एका मान्यवराचे मनोगत, अशा नियोजनबद्ध पद्धतीने सोहळा पार पडला. या अभिनव पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिरपूर पत्रकार संघाचे योगेश पाटील, विजय शुक्ल, मयूर वैद्य, रवींद्र भावसार, भरत रोकडे, जितेंद्र शेटे, जगदीश सोनवणे, दिलीप पाटील, अनिल वाघ, प्रवीण शर्मा, जयपाल चौधरी, कैलास माळी, रावसाहेब चव्हाण सर, दीपक श्रीराव आणि रोहित भावसार यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी मयूर वैद्य यांनी श्री लक्ष्मी लॉन्स विनामूल्य उपलब्ध करून दिले, भोजनाची व्यवस्था चंद्रवदन गुजराती यांनी तर विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांची सोय योगेश पाटील यांनी केली. तसेच फोटोग्राफीची व्यवस्था जितेंद्र शेटे यांनी सांभाळली. नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष संगीता देवळे व पत्रकार सेवा संघाचे विशेष सहकार्य या सोहळ्यास लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शर्मा यांनी केले, तर आभार जितेंद्र शेटे यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी उज्वल शुभेच्छा देत हा सोहळा अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला.


