गणेशोत्सवात शांतता राखण्याची जबाबदारी सर्वांचीच
हजारो नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांसोबत जनतेनेही सहकार्य करावे — पोलीस अधीक्षक अर्चित चांडक
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
मिलिंद इंगळे जिल्हा प्रतिनिधी
अकोला : आगामी गणेशोत्सव आणि गणेश विसर्जन मिरवणुका शांततामय, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केवळ पोलिसांवर सोपवून चालणार नाही. प्रत्येक नागरिकाने सामाजिक बांधिलकी जपत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले.
मूर्तिजापूर शहरातील राधा मंगलम येथे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मूर्तिजापूर उपविभागीय शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गणेशोत्सव, विसर्जन मिरवणुका, वाहतूक नियोजन, गर्दीचे व्यवस्थापन, ध्वनिक्षेपकांचा वापर तसेच सामाजिक सलोखा यासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर येतात. अशा परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी पोलीस कर्मचारी किंवा वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसते. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांवर संपूर्ण जबाबदारी न टाकता स्वतःही शिस्त आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुढाकार घ्यावा. नागरिकांचे सहकार्य मिळाल्याशिवाय कोणताही मोठा सार्वजनिक उत्सव सुरळीतपणे पार पडू शकत नाही, असे चांडक यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव हा श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सलोखा वाढविणारा उत्सव आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी तसेच नागरिकांनी मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रशासनाने निश्चित केलेल्या मिरवणूक मार्गाचे, वाहतूक नियमांचे आणि ध्वनिक्षेपकासंदर्भातील नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार हरीश पिंपळे होते. यावेळी नगराध्यक्ष हर्षल साबळे, पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, मुख्याधिकारी निलेश जाधव, गटविकास अधिकारी मिलिंद मोरे यांच्यासह मूर्तिजापूर उपविभागातील विविध पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, पोलीस कर्मचारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
प्रशासनाकडून सुरक्षेचे नियोजन
गणेशोत्सवाच्या काळात वाढणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांचा विचार करून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. उत्सवादरम्यान अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे. तसेच कोणतीही संशयास्पद घटना किंवा प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या — आमदार हरीश पिंपळे
गणेशोत्सव हा भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव असून तो अनावश्यक स्पर्धेचे स्वरूप घेऊ नये. कर्णकर्कश डीजेमुळे वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच रुग्णांना त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेश मंडळांनी डीजेचा वापर टाळून पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढाव्यात. उत्सवात शांतता, शिस्त आणि बंधुभाव कायम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार हरीश पिंपळे यांनी केले.



