घरगुती वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज; संशयिताच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना!
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
मिरज प्रतिनिधी : राजेंद्र पवार
मिरज : मिरज शहरात खुनाची धक्कादायक घटना घडली असून, शेतकरी चौक ते डोंणगे गल्ली मार्गावर धारदार शस्त्राने वार करून इलाही लालसाब शेख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. भरवस्तीत घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे संपूर्ण मिरज शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इलाही शेख हे मोटारसायकलवरून शेतकरी चौकाकडून डोंणगे गल्लीच्या दिशेने जात असताना हल्लेखोराने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोराने त्यांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इलाही शेख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घरगुती वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत आणि पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाला सुरुवात केली आहे. फरार हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी विविध पोलीस पथके रवाना करण्यात आली असून परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.मिरजेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर! एकीकडे सणासुदीचे दिवस सुरू असताना दुसरीकडे मिरज शहरात खून, मारामारी आणि हल्ल्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. भरवस्तीत अशा प्रकारे निर्घृण हत्या होत असतील, तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? असा संतप्त सवाल महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या मुळाशी जाऊन त्यामागील कारणांचा शोध घेणे, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणे आणि नागरिकांना सुरक्षिततेची हमी देणे ही पोलिसांसमोरील मोठी जबाबदारी आहे. फरार हल्लेखोराला तातडीने अटक होणार का? मिरज शहरातील कायदा-सुव्यवस्था पुन्हा कधी सुरळीत होणार? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.



