🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी : संजय दिंडे
कोल्हापूर :- शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले असून, त्याच्याकडून २,००,००० रुपये किमतीच्या चोरीच्या ४ मोटरसायकली जप्त केल्या आहेत. जयकुमार राजेंद्र पाटील (वय ३१, रा. कोडोली, ता. पन्हाळा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी आदित्य कॉर्नर पुढे असलेल्या वुडलँड हॉटेलच्या बाजूला रस्त्यावरून विठ्ठल शिवाजी सुतार (रा. सरनोबतवाडी) यांची हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक संशयित इसम चोरीची दुचाकी घेऊन कोल्हापूर रेल्वे स्टेशनजवळील हनुमान मंदिराजवळ येणार आहे.
पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयित जयकुमार पाटील याला दुचाकीसह ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने महिनाभरापूर्वी वुडलँड हॉटेलजवळून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. अधिक तपासात त्याच्या ताब्यातून शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इतर तीन गुन्ह्यांतील मिळून एकूण चार हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (किंमत २ लाख रुपये) हस्तगत करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके आणि उपनिरीक्षक अभिजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार सुशिलकुमार गायकवाड, महेश पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, सनिराज पाटील, कृष्णात पाटील, रवि आंबेकर, गौरव शिंदे, सचिन पांगे, प्रशांत आवळे आणि गणेश पाटील यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश पाटील करत आहेत.



