🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – संजय दिंडे
कोल्हापूर :- सोन्याचे दागिने घडवून देण्याच्या ऑर्डरच्या बहाण्याने एका सराफ व्यावसायिकाची तब्बल २ कोटी ३१ लाख ६५ हजार ४५६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, किरण तेजराज जैन ऊर्फ राठोड (वय ५१, रा. बंधन सेरेनिटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.फिर्यादी हर्षद रमणलाल परमार (वय ३७, व्यवसाय सराफ, रा. बेलबाग, मंगळवार पेठ, कोल्हापूर) यांचे बाबूजमाल दर्ग्यासमोर महालक्ष्मी आभूषण नावाचे दुकान आहे. आरोपी हा फिर्यादीचा नातेवाईक असल्याचा फायदा घेत त्याने विश्वास संपादन केला. त्यानंतर २३ जानेवारी २०२३ ते १५ जून २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या डिझाइनचे सोन्याचे दागिने बनवून देण्याच्या ऑर्डर दिल्या.या ऑर्डरच्या निमित्ताने आरोपीने फिर्यादीकडून वेळोवेळी २२ कॅरेटचे एकूण ३ किलो १५६ ग्रॅम सोने स्वीकारले. या सोन्याची किंमत सुमारे १ कोटी ९० लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, स्वीकारलेले सोने अथवा त्यापासून तयार केलेले दागिने फिर्यादीला परत न करता, त्यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करून विश्वासघात केल्याचा आरोप आहे.
याशिवाय २०१८ ते २०२३ या कालावधीत झालेल्या सोन्याच्या खरेदी-विक्री व्यवहारातील ४१ लाख ६५ हजार ४५६ रुपयांची येणीही आरोपीने परत केली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे सोन्याचे मूल्य आणि व्यवहारातील थकीत रक्कम मिळून एकूण २ कोटी ३१ लाख ६५ हजार ४५६ रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८.३६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल
झाल्यानंतर पोलिसांनी किरण जैन ऊर्फ राठोड याला त्याच दिवशी रात्री ११.४३ वाजता अटक केली. या प्रकरणात भारतीय दंड संहितेतील कलम ४२०, ४०६ व ४०९ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करीत असून, या आर्थिक व्यवहारामागील नेमकी वस्तुस्थिती, सोन्याची विल्हेवाट आणि थकीत रकमेबाबत पुढील तपास सुरू आहे.



