४८ तासांत गजाआड!
३ घरफोडीचे गुन्हे उघड; १ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त
DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले
तळेगाव दाभाडे : इंदुरी येथील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरातील दानपेटी आणि तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी माता मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट चोरणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना तळेगाव एम.आय.डी.सी. पोलिसांच्या तपास पथकाने अवघ्या ४८ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून १ किलो २५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम असा एकूण १,४९,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याद्वारे घरफोडीचे ३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि पोलिसांची कारवाई
दि. १२/०६/२०२६ रोजी मध्यरात्री इंदुरी येथील ग्रामदैवत कडजाई माता मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरांनी रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात बी.एन.एस. (BNS) कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५, ३ (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून ते उघडकीस आणण्याचे आदेश मा. पोलीस आयुक्त यांनी दिले होते. त्यानुसार म्हाळुंगे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सचिन कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.
चाकण परिसरातून आरोपींना अटक
तपास पथकाने घटनास्थळावरील व परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज मिळवून त्याचे सखोल अवलोकन केले. त्यानंतर गोपनीय बातमीदार सक्रिय केले असता, संशयीत आरोपी हे चाकण परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी दोन पथके तयार करून चाकण परिसरात शोधमोहीम राबवली आणि खालील दोन आरोपींना ताब्यात घेतले:
- १) कुणाल बाळु विर (वय २३ वर्षे, रा. सुंबरेनगर, चाकण, ता. खेड, जि. पुणे)
- २) लोबो उर्फ सुर्या श्रीमंतहो दास (वय २६ वर्षे, धंदा-मजुरी, रा. विठ्ठलरुख्मिणी मंदिराजवळ, कडाचीवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे)
सी.सी.टी.व्ही. फुटेज पडताळणीत हेच आरोपी निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली.
३ गुन्हे उघडकीस; चांदीचा मुकुट हस्तगत
आरोपींची सखोल चौकशी केली असता, त्यांनी तळेगाव दाभाडे आणि म्हाळुंगे परिसरातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून मेमोरंडम पंचनाम्यानुसार १ किलो २५० ग्रॅम वजनाचा देवीचा चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत:
१) तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन (गु.र.नं. १६९/२०२६) – बी.एन.एस. कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५, ३(५)
२) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन (गु.र.नं. २०२/२०२६) – बी.एन.एस. कलम ३०५, ३३१ (३), ३२४ (४)
३) दक्षिण म्हाळुंगे पोलीस स्टेशन (गु.र.नं. ५१५/२०२६) – बी.एन.एस. कलम ३०५, ३३१ (४), ३२४ (४)
तळेगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींना मुद्देमालासह अटक केली असून, सध्या त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
कामगिरी करणारे पोलीस पथक
सदर उल्लेखनीय कामगिरी पिंपरी चिंचवडचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त (परी. ०४) श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सचिन कदम, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात, पोलीस हवालदार अनंत रावण, वसीम शेख, ज्ञानेश्वर सातकर, पोलीस शिपाई गणेश दरंदले, रोहित माने, रमेश घुले, भीमराव खिलारे आणि विनायक शेरमाळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.



