DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी साईनाथ खंडेराय
नांदेड: शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, शहर वाहतूक शाखा वजिराबादच्या वतीने अवैध प्रवासी वाहतूक, विना परवाना वाहने, ट्रिपल सीट आणि रस्त्यावरील अनधिकृत हातगाड्यांवर मंगळवारी (१६ जून) रात्री मोठी धडक कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या आदेशानुसार झालेल्या या मोहिमेत एकूण २८७ केसेस दाखल करण्यात आल्या असून, ३,०८,६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
‘इन्स्टाग्राम’वरील त्या रीलची दखल; स्कूटी जप्त!
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ (रील) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता, ज्यामध्ये नांदेड शहरात एकाच स्कूटीवर तब्बल चार तरुण प्रवास करताना दिसत होते. वाहतूक पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ कारवाई केली. MH 26 AZ 3387 या क्रमांकाची संबंधित स्कूटी शोधून काढून ती ताब्यात घेण्यात आली असून, चालकावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
‘या’ मुख्य चौकांमध्ये झाली कारवाई
पोलीस निरीक्षक मारूती मुंडे व त्यांच्या पथकाने शहरातील प्रमुख आणि गजबजलेल्या भागात ही मोहीम राबवली. यामध्ये प्रामुख्याने:
जुना मोंढा व देना बँक चौक
महावीर चौक व सोनु कॉर्नर
वजिराबाद चौक
डॉक्टर लाईन, कलामंदीर आणि आय.टी.आय. परिसर
या भागांतील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे हातगाडे, फळगाडे हटवण्यात आले. तसेच ट्रिपल सीट वाहने, विना परवाना/परमिट धावणारी वाहने, भरधाव वेगाने जाणाऱ्या फटाका बुलेट आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पोलीस प्रशासनाचे नागरिकांना जाहीर आवाहन:
“नांदेड शहरातील वाहतूक शिस्तबद्ध ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आपली दोन चाकी किंवा चार चाकी वाहने रस्त्यावर कुठेही पार्क न करता, केवळ पार्किंगच्या अधिकृत ठिकाणीच पार्क करावीत. रस्त्यावर अनधिकृतपणे फळगाडे किंवा हातगाडे लावून अतिक्रमण करू नये आणि सिग्नलचे काटेकोर पालन करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल.”
कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई?
सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार आणि अपर पोलीस अधीक्षक (भोकर चार्ज, नांदेड) श्रीमती अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, शहर वाहतूक शाखा वजिराबादचे पोलीस निरीक्षक l मारूती मुंडे व त्यांच्या संपूर्ण अंमलदार पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.



