🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨 प्रतिनिधी नारायण कांबळे
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे सातबारा उताऱ्यावरील चुकीचे क्षेत्र दुरुस्त करून नवीन नाव नोंदवण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी कार्यालयातील एका खासगी उमेदवारासह दोघांवर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
काय आहे प्रकरण?
तक्रारदार यांची नागाव येथे वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीच्या गटात चुकीचे क्षेत्र नोंदवले गेल्याने ते दुरुस्त करून घेण्यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर हे प्रकरण नागाव येथील तलाठी कार्यालयाकडे आले होते. कागदपत्रे दिल्यानंतर तक्रारदारांनी कामाबाबत विचारणा केली असता, त्यांना खासगी उमेदवार अवधूत लोंढे याला भेटण्यास सांगण्यात आले.
पडताळणीत लाचेची मागणी निष्पन्न
अवधूत रामचंद्र लोंढे (वय २७, रा. नागाव) याने तलाठी मॅडमच्या नावाने १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच सुरज कुंतीनाथ सोळांकुरे (वय ४२, रा. नागाव) हा इसम सुद्धा यात लाचेची मागणी करत असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने कोल्हापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दिली.
एसीबीचा यशस्वी सापळा
प्राप्त तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता, संशयितांनी लाच मागितल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार सापळा रचून पंचांसमक्ष आरोपी सुरज सोळांकुरे याला तक्रारदाराकडून १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
कारवाई करणारे पथक
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी (विकास माने, सचिन पाटील, संगिता गावडे, संदिप पवार, वैभव खोत, प्रशांत दावणे) पार पाडली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



