⭐गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल जप्त; एका आरोपीवर आधीच गुन्हा दाखल असलेला सराईत गुन्हेगार
⭐आरोपींना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
🚨 DPT NEWS NETWORK 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी गुलाबराव भदाने
रावेर: रावेर तालुक्यातील अजंदा गावाजवळील रेल्वे पुलाजवळ बांधकाम कंत्राटदाराला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना रावेर पोलिसांनी अत्यंत शिताफीने २४ तासांच्या आत अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना ९ जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मजूर देण्याच्या बहाण्याने बोलावून रचला सापळा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी शेख जाबीर शेख अमान (वय ४१, रा. फारुकी आजम कॉलनी, चिनावल, ता. रावेर, जि. जळगाव) हे बांधकाम कंत्राटदार आहेत. त्यांना कामासाठी नेहमी मजुरांची गरज भासत असल्याने ते वेगवेगळ्या गावांमध्ये फिरत असतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन आरोपी शेख मुस्तकीम याने ४ जुलै रोजी फिर्यादींना फोन करून दोन मजूर मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
दुसऱ्या दिवशी (५ जुलै) फिर्यादींनी मजुरांबाबत विचारणा केली असता, मुस्तकीमने त्यांना विवरा येथे बोलावून घेतले. “मजूर अजंदा गावी कामासाठी गेले आहेत, आपण तिथे जाऊन येऊ,” असे सांगून मुस्तकीम फिर्यादींना घेऊन अजंदा रेल्वे पुलाजवळ गेला. तिथे आधीच पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा गाडीजवळ दोघे जण उभे होते.
चाकूचा धाक दाखवून ऑनलाईन जबरी लूट
मजुरीच्या दराबाबत बोलू असे सांगून आरोपींनी फिर्यादींना विश्वासाने शेतात नेले. तिथे एका आरोपीने फिर्यादीच्या गळ्यावर चाकू ठेवून पैशांची मागणी केली. फिर्यादीच्या खिशात असलेले ५०० रुपये काढून घेतल्यानंतर, आरोपींनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर ‘फोन पे’ (PhonePe) चा पिन क्रमांक जबरदस्तीने विचारून एका अन्य खात्यावर वेळोवेळी ८,००० रुपये वळवून घेतले आणि आरोपी तिथून पसार झाले. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३३४/२०२६ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३५१(२)(३), ३(५) प्रमाणे रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट, पण ‘गुप्त बातमी’ ठरली मोलाची
रात्रीची वेळ असल्याने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्या फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे अस्पष्ट दिसत होते, त्यामुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपींच्या गाडीबाबत गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रावेर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने (DB Team) खात्री केली असता, मुख्य आरोपी मुस्तकीम याने गुन्ह्याची कबुली दिली.
’या’ तिघांना ठोकल्या बेड्या
पोलिसांनी या प्रकरणी खालील तीन आरोपींना अटक केली आहे:
१) शेख मुस्तकीम शेख अकील (वय २२ वर्ष, रा. फतेह नगर, रावेर)
२) शेख मोईन शेख नईम (वय १९ वर्ष, रा. खिर्डी रोड, विवरा)
३) फैजल बेग हिदायत बेग (वय १९ वर्ष, रा. शंकर प्लॉट, रावेर, जि. जळगाव)
यातील आरोपी शेख मोईन शेख नईम हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही रावेर पोलीस ठाण्यात एका वृद्ध व्यक्तीला अशाच प्रकारे लुटल्याचा गुन्हा दाखल आहे. पोलिसांना संशय आहे की, या टोळीकडून आणखीही अनेक लुटीचे गुन्हे उघडकीस येऊ शकतात. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (क्र. MH19ED5580) आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस पथकाचे कौतुक
सदरची उल्लेखनीय कामगिरी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत (जळगाव विभाग), पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर (फैजपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे पो.नि. संदीप पाटील, पो.उप.निरीक्षक मनोज महाजन, पो.उप.निरीक्षक तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील पो.हे.कॉ. समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.उप.निरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.



