DPT NEWS NETWORK🚨 दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी मिलिंद इंगळे
मूर्तिजापूर :- अकोला जिल्हातील कवळा जहाँ येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सागर प्रदीप पंडित यांची सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे. नाशिक येथील ‘ज्ञानदिप सामाजिक विकास संस्था, महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, यामुळे मूर्तिजापूर तालुक्यासह अकोला जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ज्ञानदिप सामाजिक विकास संस्था ही सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी एक नामांकित संस्था आहे. संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रांत बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. यावर्षी सामाजिक श्रेणीतून सागर पंडित यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सागर पंडित यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरण पूरक कामांमध्ये स्वतःला झोकून दिले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रश्न मार्गी लावणे आणि युवकांना संघटित करून समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या याच निस्वार्थ सेवेची आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार निवडीचे पत्र ज्ञानदिप संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठवले आणि सचिव मा. मिलिंद कळवणकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे. या निवडीबद्दल सागर पंडित यांच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लवकरच एका विशेष सोहळ्यात त्यांना सहकुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.
हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेचा सन्मान आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार मला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देईल. सागर पंडित, पुरस्कारार्थी.



