🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी — नारायण कांबळे
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल संच हरविल्याबाबत दाखल झालेल्या तक्रारींची दखल घेत कोल्हापूर सायबर पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून तब्बल ४०० हरविलेले मोबाईल संच शोधून काढत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. या मोबाईल संचांची अंदाजे किंमत १ कोटी २५ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मोबाईल हरवल्यानंतर तो पुन्हा मिळेल, अशी अपेक्षा अनेक नागरिक सोडून देतात. मात्र, कोल्हापूर सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद दिसून आला आहे. शोधून काढण्यात आलेले मोबाईल संच संबंधित नागरिकांची ओळख व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
CEIR पोर्टलच्या मदतीने शोधमोहीम
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये मोबाईल संच हरविल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर संबंधित मोबाईल संचांचा तांत्रिक तपास करण्यात आला. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार सायबर पोलीस ठाणे तसेच जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे कार्यवाही केली.
हरविलेले मोबाईल शोधण्यासाठी संबंधित मोबाईल कंपन्यांशी संपर्क साधण्याबरोबरच CEIR पोर्टलचा प्रभावी वापर करण्यात आला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी महाराष्ट्रासह कर्नाटकातील विविध जिल्ह्यांपर्यंत शोधमोहीम राबवून हरविलेले मोबाईल संच शोधून काढले.
महिनाभराच्या अथक प्रयत्नांना मोठे यश
सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिसांच्या पथकाने वेगवेगळी पथके तयार करून मोबाईल शोधण्याची मोहीम राबविली. महिनाभर करण्यात आलेल्या तांत्रिक तपासातून अंदाजे १ कोटी २५ हजार रुपये किमतीचे ४०० मोबाईल संच शोधून ते पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अतिष म्हेत्रे, सह. फौजदार राजू ताटे, महिला सहा. फौजदार मिनाक्षी पाटील, पोलीस अंमलदार रविंद्र पाटील, सचिन देसाई, आसिफ कलयगार, सुरेश पाटील, सागर माळवे, अमर वासुदेव, अमर आडसूळे, अजय सावंत, विनायक बाबर, सुरेश राठोड, रोहित शिंदे, ऋषीकेश खोत, सुकुमार जाधव, संगिता खोत, पल्लवी मोहिते, अंकिता जठारे, वर्षा वसावे आणि प्रदिप कदम यांनी सहभाग घेतला.
मोबाईल परत मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान
आज दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी शोधून काढण्यात आलेले मोबाईल संच संबंधित नागरिकांना त्यांच्या मोबाईलची व कागदपत्रांची ओळख पटवून पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते परत करण्यात आले. हरविलेला मोबाईल परत मिळेल, अशी अपेक्षा नसतानाही मोबाईल मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मोबाईल हातात पडताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून आला.
सायबर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सायबर पोलिसांच्या पथकाचे अभिनंदन केले. भविष्यातही सायबर पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जास्तीत जास्त हरविलेले मोबाईल संच नागरिकांना परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


