🚨 DPT NEWS 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨
धुळे: सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘नशामुक्त धुळे जिल्हा अभियान’ यशस्वीरीत्या राबवले जात आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या संकल्पनेतून ही मोहीम जिल्ह्यातील विविध ठिकाणी राबवण्यात येत आहे.
भारताला अंमली पदार्थ आणि व्यसनाधीनतेपासून मुक्त करण्यासाठी सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे ‘नशामुक्त भारत अभियान’ (NMBE) सुरु करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री यांच्या ‘नशामुक्त भारत-२०२९’ या संकल्पनेशी सुसंगत राहून, तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बेकायदेशीर अंमली पदार्थांविरोधातील ‘Zero Tolerance’ धोरणानुसार ही कारवाई व जनजागृती केली जात आहे.
या मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील पोलीस ठाणेनिहाय हद्दीतील सार्वजनिक गणेश मंडळे आणि कार्यक्रमांच्या ठिकाणी “Drug Free Dhule District”, “निरोगी भविष्यासाठी नशामुक्त धुळे जिल्हा” आणि “व्यसनमुक्त धुळे-सुरक्षित धुळे” अशा संदेशांचे बॅनर लावून व्यापक जनजागृती केली जात आहे. याशिवाय, धुळे पोलीस दलाच्या आधुनिक चलचित्र वाहनाद्वारेही नागरिकांपर्यंत व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवला जात आहे.
तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांपासून वाचवणे आणि व्यसनमुक्त समाज घडवणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. व्यसन हे केवळ एका व्यक्तीचे नुकसान करत नसून संपूर्ण कुटुंब आणि समाज उद्धवस्त करते; त्यामुळे सशक्त भारताच्या निर्मितीसाठी युवा पिढी व्यसनमुक्त असणे अत्यंत गरजेचे आहे, असे मत पोलीस प्रशासनाने व्यक्त केले आहे.
पोलीस दलाचे आवाहन:
धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरिक, विशेषतः पालक आणि शिक्षकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या सभोवतालच्या तरुणांवर लक्ष ठेवावे आणि व्यसनमुक्तीच्या या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा.



