स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांची धडक कारवाई
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी साकिब सय्यद
धुळे: दिवसा बंद घरे फोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लांबवणाऱ्या दोन सराईत आंतरजिल्हा अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव येथून ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १३ तोळे सोन्याचे दागिने, ८३९ ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण २० लाख ८२ हजार ७०५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
काय आहे घटना?
दिनांक ०२ सप्टेंबर २०२६ रोजी धुळे शहरातील पारोळा रोड, डोंगरे महाराज नगर येथील रहिवासी फिर्यादी निलेश खंडेलवाल यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा आणि कपाटाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासावरून आरोपींचा शोध
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळाचा व परिसरातील शेकडो CCTV फुटेजचा सखोल तपास केला. तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींचा माग काढत पोलीस पथकाने मुंबई, ठाणे, भिवंडी, कोल्हापूर, पुणे, मालेगाव आणि चाळीसगाव येथे शोधमोहीम राबवली.
दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी सुझुकी बर्गमन दुचाकीवरून चाळीसगाव येथील नवनाथनगर परिसर सोडणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करत दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. मयुर उर्फ अमित सोपान भुंडे (पाटील) (वय ३९ वर्षे, रा. टिळेवाडी, कोथरूड, पुणे; सध्या रा. चाळीसगाव, जि. जळगाव)
(या आरोपीविरुद्ध पुणे, सांगली आणि रायगड (खोपोली) येथील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकुण २७ घरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.)
२. ऋषभ भागवतप्रसाद जयस्वाल (वय ३१ वर्षे, रा. कापूरबावडी, ठाणे)
(या आरोपीविरुद्ध नागपाडा (मुंबई) आणि ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात ०५ चोरीचे गुन्हे दाखल आहेत.)
हस्तगत केलेला मुद्देमाल (एकूण किंमत: ₹२०,८२,७०५/-):
सोन्याचे दागिने: रु. १७,२६,३००/- किमतीचे ३०.१० ग्रॅमचे मंगळसूत्र, साखळ्या, अंगठ्या, कानपूल, नाथ व कॉईन्स (सुमारे १३ तोळे सोन्याचे दागिने).
चांदीचे दागिने: रु. १,९६,४००/- किमतीचे ८३९ ग्रॅम वजनाचे तांबे, पेला, वाट्या, पायातील पायळ, जोडवे व नाणी.
रोख रक्कम: रु. ४९,०००/-
इतर: आरोपींचे २ मोबाईल फोन (रु. ११,०००/-) आणि गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमन मोटरसायकल (MH-47/BQ-2130, किंमत रु. १,००,०००/-).
पोलीस पथकाची कामगिरी
ही कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सपोनि दीपक ढोके, पोउपनि चेतन मुंडे तसेच अंमलदार राहुल सानप, धर्मेंद्र मोहिते, आरिफ पठाण, शशांक देवरे, संतोष हिरे, अमोल पाटील व सुशिल शेंडे यांनी यशस्वीपणे पार पाडली.



