१२८ किलो गांजा जप्त; दोन आरोपी ताब्यात, ८०.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
उमरगा–नळदुर्ग महामार्गावर आयशर वाहनातून गांजाची वाहतूक; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
🚨DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी परवेज शेख
धाराशिव : जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल १२८ किलो ३८० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. उमरगा–नळदुर्ग महामार्गावर आयशर वाहनातून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत गांजासह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन असा एकूण ८० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांचे पथक कोंबिंग ऑपरेशनदरम्यान हैदराबाद–सोलापूर महामार्गावर गस्त घालत होते. यावेळी उमरगा ते नळदुर्ग मार्गावर MH 45 AX 9456 क्रमांकाचे आयशर वाहन संशयास्पदरीत्या वेगाने जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग करून जळकोटजवळील हॉटेल निरंजन परिसरात ते थांबवले. वाहनाची झडती घेतली असता आत लपवून ठेवलेली गांजाची ६३ पाकिटे आढळून आली. तपासणीत एकूण १२८ किलो ३८० ग्रॅम गांजा मिळून आला. जप्त गांजाची किंमत ६४ लाख १९ हजार रुपये असून, गांजा वाहतुकीसाठी वापरलेल्या आयशर वाहनाची किंमत १६ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ८० लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
या प्रकरणी आकाश साहेबराव दांगट (वय २९) आणि सागर महादेव जाधव (वय ३५), दोघेही रा. आनंदनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार गादेकर, मुज्जू पठाण, पोलीस नाईक अशोक ढगारे तसेच चालक पोलीस हवालदार चौरे व गुरव यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात धाराशिव पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले असून, जिल्ह्यातील अवैध अमली पदार्थांच्या व्यवहारांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.



