🚨 DPT NEWS 🚨दर्शन पोलीस टाईम🚨
प्रतिनिधी – निवास गागडे
इचलकरंजी :- अंगणवाडी बचत गटांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या शालेय अन्नपुरवठा योजनेच्या मागील सहा महिन्यांच्या थकीत बिलांना मंजुरी देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला व बाल विकास विभागातील मुख्य सेविकेसह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी (२१ सप्टेंबर) सापळा रचून पकडले. या कारवाईमुळे महिला व बाल विकास विभागात खळबळ उडाली आहे.इचलकरंजी येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या मेनका मनोहर माने-कोरवी (वय ४४, मुख्य सेविका) यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारीनुसार, बचत गटांमार्फत ११ अंगणवाड्यांना शालेय अन्नपुरवठा योजनेचे मागील सहा महिन्यांचे थकीत बिल मंजूर करून घेण्यासाठी प्रत्येक अंगणवाडीच्या महिन्याला ५०० रुपये या प्रमाणे ३३ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता.तक्रारीची एसीबीकडून २१ सप्टेंबर रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी तडजोडीनंतर ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने सांगितले.
यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.सापळ्या
दरम्यान मुख्य सेविका मेनका माने-कोरवी यांनी लाचेची रक्कम त्यांच्या कार्यालयातील ठेकेदार दिपक दिनकर कांबळे (वय ४९, रा. कोळेकर बिल्डिंग, कोल्हापूर नाका, इचलकरंजी) यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे समोर आले. त्यानुसार कांबळे यांनी पंचांसमक्ष ३० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.
या प्रकरणी मुख्य सेविका मेनका माने-कोरवी आणि खासगी इसम दिपक कांबळे यांच्याविरुद्ध इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार संदीप काशीद, पोलीस हवालदार सुधीर पाटील, महिला पोलीस हवालदार संगीता गावडे, पोलीस शिपाई कृष्णा पाटील, पोलीस शिपाई वैभव खोत तसेच चालक सहाय्यक पोलीस फौजदार गजानन कुराडे यांच्या पथकाने केली.



